मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा; संघर्षातून केली कोरोनारुपी संकटावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 11:47 PM2020-12-30T23:47:49+5:302020-12-30T23:48:01+5:30
संघर्षातून केली कोरोनारुपी संकटावर मात : सलामी जनसामान्यांच्या असामान्य लढ्याला
ठाणे : सरते वर्ष प्रत्येक माणसाच्या मनावर `काळेकुट्ट वर्ष` हीच ओळख कोरुन संपणार आहे. गेल्या नऊ महिन्यांत प्रत्येकाचे आयुष्य कोरोनाने कुरतडून टाकले. काहींच्या कुटुंबात मृत्यूचे तांडव घडवले. काही कुटुंबांत एकाचवेळी अनेकजण इस्पितळात असल्याने त्यांनाही शारीरिक व आर्थिकदृष्ट्या कोरोनाने विकलांग केले. काहींना कोरोनाने स्पर्श केला नाही; मात्र रोजगार हिरावला, काहींच्या वेतनाला कात्री लागली. आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून कोरोनाविरुद्ध लढले.
आता कोरोना आटोक्यात असल्याचे निदान आकडेवारीवरुन जाणवते. मात्र कोरोना समूळ नष्ट झालेला नाही. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्याने व तेथून काही प्रवासी दाखल झाल्याने धोका कायम आहे. मात्र या अंधकारमय वातावरणात ठामपणाने उभे राहिलेले सामान्यजन साऱ्यांना नव्या वर्षात प्रेरणा देणार आहेत. कुसुमाग्रज यांच्या शब्दात सांगायचे तर मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा; पाठीवरती हात ठेऊन, तुम्ही फक्त लढ म्हणा हाच संदेश त्यांच्या संघर्षकथा देत आहेत.