पक्षांसमक्ष मतदानयंत्रांचे सरमिसळीकरण, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 01:25 AM2019-10-01T01:25:39+5:302019-10-01T01:26:05+5:30
ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांसाठी विविध ठिकाणांहून प्राप्त झालेल्या मतदानयंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली.
ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांसाठी विविध ठिकाणांहून प्राप्त झालेल्या मतदानयंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची प्रक्रिया (फर्स्ट रॅण्डमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या साहाय्याने सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आले. याशिवाय, या यंत्रांचे विधानसभानिहाय वाटपही करण्यात आले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात मतदानयंत्रांचे सरमिसळीकरण करतेवेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी, उपजिल्हाधिकारी मनोज गोहाड, ईव्हीएम व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी संदीप माने यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या मतदानयंत्रांमधून प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानकेंद्रांच्या संख्येच्या १२० टक्के बॅलेट युनिट व ११३ ते ११५ टक्के कंट्रोल युनिट, मतदान केंद्रांच्या संख्येच्या १२७ टक्के व्हीव्हीपॅट या प्रमाणात मतदानयंत्रांचे वितरण करण्यासाठी प्रथम सरमिसळीकरण प्रक्रिया सोमवारी राबविण्यात आली.
आता संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या या सरमिसळ प्रक्रियेनुसार तुर्भे येथील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आलेल्या मतदानयंत्रांचे विधानसभा मतदारसंघनिहाय वितरण केले जाणार आहे. या प्रथम टप्प्यातील सरमिसळ प्रक्रियेनंतर आता दुसऱ्या टप्प्यातील सरमिसळ प्रक्रि या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर होणार आहे. त्यावेळी मतदानयंत्रांचे मतदान केंद्रनिहाय वितरण केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.