मीरारोडमध्ये साकारणार अमर जवान स्मारक, शहीद मेजर कौस्तुभ राणेच्या बलिदानातून मिळाली प्रेरणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 05:14 PM2019-01-08T17:14:28+5:302019-01-08T17:15:38+5:30
काश्मीर येथे दहशतवाद्यांच्या हल्लयात मीरारोडचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्याने त्यांच्या या बलिदानातून प्रेरणा मिळालेले हिमेश शहा सृष्टी परिसरातील सेक्टर ३ गृहसंकुलाच्या मैदानात आपले सहकारी व सृष्टी गृहसंकुल फेडरेशनच्या सहकार्याने अमर जवान स्मारक येत्या १५ जानेवारी रोजी साकारणार आहेत.
- राजू काळे
भाईंदर - काश्मीर येथे दहशतवाद्यांच्या हल्लयात मीरारोडचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्याने त्यांच्या या बलिदानातून प्रेरणा मिळालेले हिमेश शहा सृष्टी परिसरातील सेक्टर ३ गृहसंकुलाच्या मैदानात आपले सहकारी व सृष्टी गृहसंकुल फेडरेशनच्या सहकार्याने अमर जवान स्मारक येत्या १५ जानेवारी रोजी लष्कर दिनाचे औचित्य साधून साकारणार आहेत.
शहरातील प्रत्येकाच्या मनात देशप्रेम कायम जागृत रहावे, त्यांचे ऊर शहीद जवानांच्या त्यागामुळे सतत अभिमानाने भरुन यावे, असा उद्देश यामागे ठेवण्यात आल्याचे शहा यांनी सांगितले. देशाच्या सीमेवर जवानांचा खडा पहारा असल्यानेच आपण सुरक्षित असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करुन त्यातूनच शहीद स्मारक साकारण्याच्या संकल्पनेने गेल्या अनेक वर्षांपासून डोक्यात चळवळ उभी केली होती. त्यातच गेल्या वर्षी मीरारोड येथील मेजर कौस्तूभ राणे दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत शहीद झाले. त्यांच्या बलिदानामुळे शहर भावनाविवश झाले होते. परंतु, मला त्यातून सुरू असलेल्या चळवळीला अंतिम स्वरुप देण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. जवानांच्या बलिदानानंतर अथवा स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, क्रांती दिनावेळीच लोकांच्या मनात देशभक्तीची भावना उफाळून येते. या मर्यादित देशभक्तीला कायमस्वरुपी तेवत ठेवण्यासाठी त्यांनी स्मारक साकारण्याची संकल्पना आपले सहकारी तसेच सृष्टी गृहसंकुल फेडरेशनच्या पदाधिकाय््राांसमोर मांडली. त्यांना शहा यांची संकल्पना आवडल्याने त्यांनी गृहसंकूलातीलच मैदानात स्मारक साकारण्यास शहा यांना परवानगी दिली. याच गृहसंकुलात लष्करातून निवृत्त झालेले २१ जवान वास्तव्य करीत असून त्यांची माहिती शहराला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त करुन त्यासाठीच स्मारक साकारण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्मारकात अमर जवानाची साडेपाच फूटी प्रतिकृती साकारण्यासाठी त्यांनी दहिसर येथील मुर्तीकार किणी यांना सांगितले.
जवानाची प्रतिकृती अंतिम टप्प्यात असुन येत्या १५ जानेवारीच्या लष्कर दिनाचे औचित्य साधून त्याचे अनावरण वरीष्ठ नाविक अधिकारी (कोमोडोर) तथा मुंबई माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बिमन मेस्त्री यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एका गृहसंकुलात तेथीलच रहिवाशांच्या मदतीने साकारण्यात येणारे हे स्मारक पहिलेच ठरणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.