अंबरनाथमधील वीज वितरणाच्या विरोधात आमरण उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 06:06 PM2019-01-16T18:06:01+5:302019-01-16T18:06:09+5:30
अंबरनाथमधील वीज वितरण विभागाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आणि वाढत्या वीज दराच्या विरोधात स्वाभिमान संघटनेच्या वतीने आमरण उपोषण बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे.
अंबरनाथ: अंबरनाथमधील वीज वितरण विभागाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आणि वाढत्या वीज दराच्या विरोधात स्वाभिमान संघटनेच्या वतीने आमरण उपोषण बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे. वीज वितरण विभागाच्या कार्यालयाबाहेर हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
स्वाभिमान संघटनेचे अंबरनाथ तालुका अध्यक्ष विकास सोमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. वीज ग्राहकांना वीज वितरण विभागामार्फत वाढीव बिल देण्यात येते, चुकीचे बिल देऊन ग्राहकांची लूट केली जाते, कार्यालयात येणा-या ग्राहकांना मानसिक त्रास देण्याचे काम केले जाते, असे आरोप करीत सोमेश्वर यांनी हे उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या मागण्यांमध्ये वीज बिलातील स्थिर आकाराच्या नावावर केलेली वाढ रद्द करणे, मुंबईत खासगी वीज कंपनी स्वस्त वीज विकत आहेत, तर शासनाची यंत्रणा असताना अंबरनाथच्या ग्राहकांना महाग दराने वीज घ्यावी लागत असल्याने या भागातील विजेचे दर कमी करणे, वीजबिलांचे वाटप वेळेवर होत नसल्याने नागरिकांना दंडात्मक रक्कम भरावी लागत असल्याने त्यातील त्रुटी कमी करणे, तक्रार घेऊन येणा-या नागरिकांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात.
योग्य प्रकारे काम केले जात नाहीत, वीजबिल न भरल्यास 2 महिन्यांत वीज जोडणी तोडण्याची तरतूद आहे. सोबत एक नोटीस देणे बंधनकारक आहे. मात्र अंबरनाथ शहरात एका महिन्याचे बिल भरले गेले नाही तर थेट वीज जोडणी तोडण्याचे काम केले जाते. जोडणी तोडल्यावर पुन्हा त्याची जोडणी करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी आर्थिक व्यवहार करतात. सर्वसामान्य नागरिकांना होणा-या या त्रासाची दखल घेत स्वाभिमान संघटनेच्या पुढाकाराने उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्यात विकास सोमेश्वर, विशाल सोनावणे, अॅड. अमोल वाजे, लखन चौहान, गुरू चलवादी आणि शंकर कोळी आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमरण उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत या समस्यांवर तोडगा निघत नाही तोवर उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे.