अंबरनाथ स्थानकाचा लवकरच कायापालट, १ नोव्हेंबरपासून वाढीव फेऱ्यांचा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 06:04 PM2017-10-10T18:04:03+5:302017-10-10T18:04:29+5:30
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मध्य रेल्वेवरील अंबरनाथ स्थानकाचा संपूर्ण कायापालट होणार असून अंबरनाथवासीयांना लवकरच नवा होम प्लॅटफॉर्म, ४ एस्कलेटर्स, नवा एफओबी आणि रेल्वेची नवी इमारत मिळणार आहे.
डोंबिवली: खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मध्य रेल्वेवरील अंबरनाथ स्थानकाचा संपूर्ण कायापालट होणार असून अंबरनाथवासीयांना लवकरच नवा होम प्लॅटफॉर्म, ४ एस्कलेटर्स, नवा एफओबी आणि रेल्वेची नवी इमारत मिळणार आहे. मुंबई दिशेकडील एफओबीचा देखील विस्तार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, ठाण्यापुढील प्रवाशांसाठी रेल्वेच्या १६ वाढीव फेऱ्या एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.
अंबरनाथ स्थानकातील वाढत्या गर्दीवर उतारा म्हणून खा. डॉ. शिंदे यांनी अंबरनाथ स्थानकात पश्चिम दिशेला होम प्लॅटफॉर्म बांधण्याची मागणी केली होती. तसेच, मे महिन्यात रेल्वे अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात जागेची पाहणी देखील केली होती. मंगळवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्यासमवेत यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आ. डॉ. बालाजी किणीकर, मध्य रेल्वेचे विभागीय उपव्यवस्थापक आर. के. गोयल, एमआरव्हीसीचे परमिंदर सिंग, आयआरसीटीसीचे अरविंद मालखेडे यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, धनंजय बोडारे, नगरसेवक सुभाष साळुंके, रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
खा. डॉ. शिंदे यांनी अंबरनाथ येथे होम प्लॅटफॉर्मची मागणी लावून धरली होती. श्री. शर्मा यांनी हा प्रकल्प एमयूटीपी ३ अंतर्गत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती याप्रसंगी दिली. जागतिक बँकेची मंजुरी एक-दोन दिवसात अपेक्षित असून येत्या दोन महिन्यात निविदा प्रक्रिया होईल, अशी माहिती याप्रसंगी देण्यात आली.
या होम प्लॅटफॉर्मसह स्थानकाच्या मध्यभागी पादचारी पुलाची मागणी देखील खा. डॉ. शिंदे यांनी केली होती. ती देखील मान्य झाली असून नवा सहा मीटर रुंद पूल होणार आहे. यामुळे कर्जत दिशेकडील पुलावरील गर्दी कमी होणार आहे. या पुलाला तीन एस्कलेटर्स बसवण्यात येणार असून कर्जत दिशेकडील जुन्या एफओबीला देखील प्लॅटफॉर्म क्र. तीनवर एस्कलेटर बसवण्यात येणार आहे. स्थानकाची जुनी प्रशासकीय इमारत पडून त्याजागी दोन मजली इमारतही बांधण्यात येणार आहे.
एक नोव्हेंबर पासून वाढीव फेऱ्यांचा दिलासा
एक नोव्हेंबर पासून मध्य रेल्वेवर गर्दीच्या वेळेत १६ वाढीव फेऱ्या सुरू होणार असून त्या सर्व ठाण्यापुढील प्रवाशांसाठी आहेत. ठाण्यापुढील वाढती गर्दी लक्षात घेता अधिकाधिक फेऱ्या ठाण्यापुढील स्थानकांसाठी सुरू करण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली होती. त्यानुसार दादर-बदलापूर (२), दादर-टिटवाळा (२), दादर-डोंबिवली (६) आणि कुर्ला - कल्याण (६) अशा वाढीव फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. या वाढीव गाड्यांमध्ये महिलांसाठी तीन ज्यादा डबे राखीव ठेवण्यात येणार आहेत.
दिवा स्थानकातही होणार नवा एफओबी
दिवा स्थानकात कल्याण दिशेला एफओबी बांधण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली होती. ती देखील मंजूर झाली असून स्थानकाच्या मध्यभागी असलेल्या एफओबीचा देखील पूर्व दिशेला विस्तार करण्यात येणार आहे. मुंबई दिशेकडील जुना एफओबी देखील रुंद करण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी केली असता या ठिकाणी नवा एफओबी बांधण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने दाखवली. हे तिन्ही एफओबी स्काय वॉकच्या माध्यमातून जोडण्याबाबत ठाणे महापालिकेला सूचना करण्यात आल्याचेही खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले. दिवा पूर्व येथे मुंबई दिशेला तिकीट ऑफिस बांधण्याची मागणीही मान्य करण्यात आली आहे.