अंबरनाथला यंदाही नालेसफाईचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:27 AM2018-05-31T00:27:18+5:302018-05-31T00:27:18+5:30

नालेसफाई दरवर्षी केली जात असतानाही पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे यंदाही नालेसफाईच्या कामाला विलंब झाला आहे

Ambaranatha is still the cause of Nalasefai | अंबरनाथला यंदाही नालेसफाईचा घोळ

अंबरनाथला यंदाही नालेसफाईचा घोळ

Next

पंकज पाटील
अंबरनाथ : नालेसफाई दरवर्षी केली जात असतानाही पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे यंदाही नालेसफाईच्या कामाला विलंब झाला आहे. ३१ मे पर्यंत काम पूर्ण करणे गरजेचे असतानाही पालिकेने २५ मे नंतर नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली. कमी कालावधीत अधिक नालेसफाई करावी लागणार असल्याने कामाचा दर्जा योग्य राखणे अधिकाऱ्यांना त्रासाचे जात आहे. नालेसफाईचा घोळ दरवर्षीप्रमाणे तसाच राहिल्याने पालिका प्रशासन नालेसफाईच्या बाबतीत गंभीर नसल्याचे चित्र दिसत आहे.
अंबरनाथ नगरपालिकेने प्रत्येकवर्षी नालेसफाईच्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. नालेसफाईच्या नावावर केवळ आर्थिक तरतूद करून ती तरतूद संपवण्याकडेच पालिकेचे लक्ष केंद्रित झाले आहे. शहरातील लहानमोठ्या नाल्यांची सफाई करण्यासाठी दरवर्षी निविदा काढण्याची प्रक्रिया असते. मात्र, प्रत्येकवेळी नालेसफाईचा विषय एप्रिल आणि मे मध्येच मंजूर करून पुढे निविदा प्रक्रिया होते. दरवर्षीचे काम असल्याने या कामाची मंजुरी जानेवारी, फेब्रुवारीमध्येच पूर्ण करून निविदा प्रक्रिया करणे गरजेचे असते. मात्र, पालिका अधिकारी कंत्राटदारांच्या सोयीसाठी प्रत्येकवेळी शेवटच्या महिन्यातच विषय मंजूर करून घेत आहे.
अनेक वर्षांची परंपरा माजी मुख्याधिकारी गणेश देशमुख यांनी मोडीत काढली होती. डिसेंबरमध्येच नालेसफाईचे काम मंजूर करून त्या कामाला मे महिन्यातच सुरुवात केली होती. मात्र, देशमुख यांची बदली झाल्यावर पुन्हा जुनीच कामाची पद्धत अवलंबली जात आहे. मे महिन्यात जे काम करायचे आहे, त्या कामाला मंजुरी घेण्यासाठी त्याच महिन्यात विशेष सभा लावण्याची वेळ पालिकेवर येते. ज्या कामाचे नियोजन पाच ते सहा महिन्यांपूर्वी करणे गरजेचे आहे, ते काम शेवटच्या क्षणी मंजूर करून कंत्राटदाराला झुकते माप दिले जात आहे.
नालेसफाईच्या निविदेसोबत नालेसफाईच्या कामातही तेवढ्याच प्रमाणात त्रुटी निर्माण झाल्या आहेत. नालेसफाई केल्यावर नाल्यातील गाळ हा सुकण्यासाठी नाल्याच्या बाजूला ठेवला जात आहे. मात्र, हा सुकलेला गाळ पुन्हा दोन ते तीन दिवसांत भरून नेणे गरजेचे आहे. मात्र, अनेक ठिकाणी असे होत नसल्याने काढलेला गाळ पुन्हा पावसाळ्यात नाल्यात जातो. अंबरनाथ पालिकेने सुरू केलेल्या नालेसफाईच्या कामात यंदाही अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे प्रयत्न केले जात आहे. मात्र, सुरुवातीचे तीन ते चार दिवस काम योग्य दाखवल्यावर शेवटच्या टप्प्यात काम मारून नेण्याचे काम कंत्राटदार करत आले आहेत. त्यामुळे यंदाच्या नालेसफाईच्या कामावर अधिकाºयांसोबत नगरसेवकांनीही लक्ष ठेवावे, असे आवाहन नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी केले आहे.
अंबरनाथमधील महत्त्वाच्या नाल्यांपैकी एक नाला म्हणजे विम्को कंपनीशेजारील नाला. या नाल्यात दरवर्षी प्रचंड गाळ अडकलेला असतो. मात्र, या नाल्यातील गाळ काढण्याकडे कुणाचेच लक्ष गेलेले नाही. प्रत्येकवेळी या नाल्याची वरवर स्वच्छता केली जाते. शिव मंदिरापासून वाहणारा दुसरा महत्त्वाचा नाला म्हणजे वालधुनी नदी.
नावाला नदी असली तरी त्याचे रूपांतर नाल्यात झाले आहे. या नाल्याच्या स्वच्छतेची जबाबदारी उल्हासनगर पालिकेसोबत अंबरनाथ पालिकेचीही आहे.


अधिकाºयांनाच शाश्वती नाही
कमलाकरनगर येथील मोठा नाला, बालाजीनगर नाला, बी-केबिन नाला, लोकनगरी नाला, गोविंद तीर्थपूल नाला यांची नियमानुसार स्वच्छता न झाल्यास त्याचा त्रास नागरिकांना होणार आहे. या नालेसफाईच्या कामावर प्रत्येकवर्षी आरोप होत असले, तरी त्या कामासाठी असलेला खर्च आणि त्याची तरतूद ही हवी तशी वाढलेली नाही. नालेसफाईवर खर्च वाढवला, तरी ते काम योग्य प्रकारे होईलच, याची शाश्वती अधिकाºयांना नाही. त्यामुळेच कमीतकमी खर्चात काम कसे होईल, याकडे पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. यंत्राद्वारे नालेसफाई करताना अनेक ठिकाणी अडचणी येत असल्याने त्या ठिकाणी मनुष्यबळाचा वापर करून नालेसफाईचा प्रस्ताव आहे. कंत्राटदाराकडून कामगार घेऊन ती नालेसफाई करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, ते काम करतानाही वरवर काम केले जात आहे. कामगारांनी काढलेल्या गाळाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नाही. एकंदरीत नालेसफाईबाबत अधिकारी कूचकामी पडत आहे, हे उघड होत आहे. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारावर अंबरनाथमधील नागरिकांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.नालेसफाईच्या बाबतीत दरवर्षी तक्रारी येत असतात. नालेसफाईच्या कामाबाबत नागरिक समाधानी दिसत नाहीत. त्यामुळे यंदा नालेसफाईच्या कामात नगरसेवकांना लक्ष घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कामात हयगत झाल्यास अधिकाºयांवर कारवाई केली जाईल.
- मनीषा वाळेकर, नगराध्यक्ष

Web Title: Ambaranatha is still the cause of Nalasefai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.