अंबरनाथसह २७ गावांच्या शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 11:58 PM2019-05-11T23:58:57+5:302019-05-11T23:59:08+5:30
जिल्हा परिषदेच्या दोन हजार ११९ शिक्षकांच्या या आॅनलाइन बदल्या विविध समस्यामुळे चर्चेत आल्या आहेत.
ठाणे : जिल्हा परिषदेच्या दोन हजार ११९ शिक्षकांच्या या आॅनलाइन बदल्या विविध समस्यामुळे चर्चेत आल्या आहेत. आता त्यात कल्याण डोंबिवली मनपा परिसरातील २७ गावे आणि अंबरनाथ तालुक्यातील नऊ गावे यातील सुमारे शंभरपेक्षा अधिक शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, तरीही या शिक्षकांनी बदलीच्या ठिकाणी हजर होण्याची अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे हा शिक्षकवर्गही संभ्रमावस्थेत सापडला आहे.
जिल्हा परिषदेच्या या आॅनलाइन बदल्या विविध कारणांखाली गाजत आहेत. अन्याय सहन करून घ्यायचा नाही, या मानसिकतेतील शिक्षकवर्ग अन्यायाविरोधात न्यायालयात धाव घेत आहे. बनावट कागदपत्रे, सेवाज्येष्ठता डावलल्याने, वैद्यकीय कागदपत्रे बनावट दिल्यामुळे या बदल्यांमध्ये आधीच अडथळे येत आहेत. त्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेत ठेवण्याची मागणी २७ गावांमधील शिक्षकांनी आधीच केली आहे. यात ८० ते ८५ शिक्षकांचा समावेश आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नऊ गांवामधील शिक्षकांनीदेखील नगरपालिकेत राहण्याचे मागणी लावून धरली आहे. यामुळे या शिक्षकांनी न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केल्या आहेत. पण त्यास न जुमानता या शिक्षकांनी बदली झालेल्या शाळांवर हजर होण्याची अपेक्षा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून व्यक्त होत आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेमधील २७ गावांच्या शाळा जिल्हा परिषदेत वर्ग न करता त्या महापालिकेतच ठेवाव्यात. यासाठी भाल, व्दारली, वसार, चिंचपाडा आदी २७ गावांच्या शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांची सुनावणी ४ जून रोजी आहे. तर जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील नऊ गावांच्या शाळा अंबरनाथ नगरपालिकेकडे वर्ग झालेल्या नाही. यामध्ये पाले, चिखलोली, जावसई, फॉरेस्टनाका आणि जांभवली आदी या नऊ गावाचा समावेश आहे. या शिक्षकांनादेखील २७ गावांच्या शिक्षकांप्रमाणे ३० टक्के घरभाडे लागू आहे. यामुळे या नऊ गावांमधील प्राथमिक शिक्षकांनी न्यायालयात धाव घेऊन या आॅनलाइन बदल्यांविरोध स्थगिती मिळवली आहे.
याप्रकरणी सुनावणी ७ जून रोजी उच्च न्यायालयात आहे. न्यायालयात धाव घेऊन या शिक्षकांनी या आॅनलाइन बदल्यांना स्थगिती मिळवलेली आहे. पण या शिक्षकांनी वेळीच हजर होण्याची अपेक्षा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून व्यक्त होत असल्यामुळे या शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्यावर शिक्षण विभागाकडून बोलणे टाळले जात आहे. त्यामुळे एकूण शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे.
बदलीच्या शाळांवर हजर व्हा!
सर्व शिक्षकांच्या बदल्या आॅनलाइन झालेल्या आहेत. २७ गावांमधील शिक्षकांचाही समावेश आहे. त्यांनी बदली शाळांवर हजर व्हायला पाहिजे, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी सांगितले.