अंबरनाथ पालिका निवडणूक : दिग्गजांना शोधावा लागणार प्रभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:45 AM2020-02-26T00:45:34+5:302020-02-26T00:45:36+5:30
आरक्षण सोडतीचा बसला फटका, स्थलांतरित होण्याची आली वेळ
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीत सर्वच दिग्गज नगरसेवकांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे या नगरसेवकांना आता इतर प्रभागात स्थलांतरीत होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कोणत्या प्रभागात कोण जाणार यावर चर्चा रंगली आहे.
अंबरनाथ नगरपालिकेत ५७ प्रभागांची आरक्षण सोडत निश्चित करण्यात आली. प्रथम अनुसूचित जातीच्या आठ प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा फटका हा नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या बालाजीनगर प्रभागावर पडला. तसाच परिणाम माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या भास्करनगर भागालाही बसला आहे. या सोबत काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील यांचा प्रभागही महिलांसाठी राखीव झाला आहे. असाच फटका राष्ट्रवादीचे गटनेते सदाशिव पाटील यांना बसला आहे. त्यांचा प्रभागही महिला राखीव झाल्याने त्यांना नव्या प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे. दिग्गजांमध्येच शिवसेनेचे गटनेते राजू शिर्के यांचा प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. पंढरीनाथ वारिंगे, सचिन पाटील, रवींद्र पाटील, भरत फुलोरे, उमेश गुंजाळ, उमेश पाटील, मिलींद पाटील आणि कुप्पन आनंद कन्नन यांचे प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांचा पत्ता कट झाला आहे. तर काही नगरसेवकांचे प्रभाग हे आरक्षणात बाधित झाले आहेत. त्यात वसंत पाटील, करुणा रसाळ, श्रुती सिंह, वृषाली पाटील, उमर इंजिनियर, शेख शरीफा, कल्पना गुंजाळ, सुभाष साळुंके, जयश्री पाटील आणि योगिता वारिंगे या नगरसेवकांना जातीच्या आरक्षणाचा फटका बसला आहे.
अनके दिग्गजांना आता आरक्षण सोडतीनंतर दुसऱ्याच्या प्रभागात जाण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे मनीषा वाळेकर, प्रदीप पाटील, राजेंद्र वाळेकर, निखील वाळेकर, सादाशिव पाटील, उमेश पाटील, प्रज्ञा बनसोडे, राजू शिर्के, सुभाष साळुंके, अशोक गुंजाळ, सचिन पाटील, उमेश गुंजाळ या सारखे नगरसेवक कोणत्या प्रभागात उडी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लॉटरी लागलेले उमेदवार
आरक्षण सोडतीत अनेकांच्या वाट्याला निराशा आलेली असतांना काही प्रभाग दिग्गज उमेदवारांसाठी लाभदायक ठरले आहेत. त्यात प्रभाग क्रमांक ४ मध्ये चरण रसाळ, प्रभाग क्रमांक ३० स्वामीनगर येथे अब्दुल शेख, प्रभाग क्रमांक १५ चिंचपाडा मध्ये कबीर गायकवाड यांच्यासाठी प्रभाग आरक्षित झाला आहे. तर स्टेशन विभाग शिवदर्शन बंगला परिसराचा प्रभाग हा माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्यासाठी पुन्हा खुला झाला आहे. तर खेर सेक्शन हा प्रभाग पुरुषोत्तम उगले यांच्यासाठी खुला झाला आहे.