कचरा प्रकल्पाला अंबरनाथचा होकार; पालिकेची झाली विशेष सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 10:41 PM2020-01-02T22:41:55+5:302020-01-02T22:44:41+5:30
आर्थिक बाबींवर झाली चर्चा, बदलापूर पालिकेचा अद्याप निर्णय नाही
अंबरनाथ : स्पेनच्या तंत्रज्ञानावर आधारित घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्यासाठी अंबरनाथ पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांसाठी एकत्रित प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी अंबरनाथ पालिकेने होकार दिला आहे तर बदलापूर पालिका या संदर्भात अद्याप निर्णयाच्या प्रक्रियेत आहे. अंबरनाथ पालिकेत या संदर्भात विशेष सभा गुरूवारी घेण्यात आली. या सभेत प्रकल्पाच्या आर्थिक बाबीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अंबरनाथ शहरात घनकचरा व्यवस्थापनच्या अंतर्गत कचºयावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्याच्या बाबतीत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी विशेष सभा झाली. या सभेत स्पेनच्या तंत्रज्ञानावर आधारित कचºयावर प्रक्रिया करणारी यंत्रणा ही अंबरनाथ आणि बदलापूर शहरात राबविण्याचा विचार करण्यात आला. पालिकेला आर्थिक भार सांभाळावा लागणार असल्याने भाजपचे नगरसेवक तुळशीराम चौधरी यांनी या प्रकल्पासोबत इतर प्रकल्पांवरही विचार करण्याची सूचना केली.
या प्रकल्पात पालिकेला आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे. तसेच वर्षाकाठी काही रक्कमसुद्धा पालिकेला द्यावी लागणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासोबत इंदूर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनेच्या प्रकल्पाचा विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तेथे पालिकेला वर्षाला रॉयल्टीच्या स्वरुपात आर्थिक मदत होते.
त्यामुळे पालिकेला आर्थिक लाभ होईल अशा प्रकल्पाचाही विचार करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. यावर काँग्रेस नगरसेवकांनीही बाजू मांडताना हा प्रकल्प महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून राबवत असताना त्यात चूक होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना केली. केवळ प्रकल्प चांगला दिसत आहे म्हणून तो राबविण्यापेक्षा इतर पर्यायांचेही अवलोकन करावे. पालिकेचा निधी या प्रकल्पावर खर्च होणार असल्याने तो प्रकल्प अपयशी ठरणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. तसेच या प्रकल्पाला पालिकेचा निधी कमीतकमी लागावा यासाठी अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
वर्षाचा येणारा खर्च हा कमी कसा होईल यावर विचार करुन निर्णय घेण्याची मागणी केली. प्रकल्प उभारत असताना अंबरनाथ पालिका ही प्रकल्प राबविणारी प्रयोगशाळा होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली. पालिकेकडे आलेल्या तीन प्रस्तावांपैकी इतर दोन प्रस्ताव सभागृहात चर्चेला न आणल्याने याबाबत काँग्रेस नगरसेवकांनी अधिकाºयांना धारेवर धरले. तीन प्रस्ताव आलेले असतांना त्याचे अवलोकन करण्यासाठी ते तिन्ही प्रकल्प सभागृहासमोर आणण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
स्पेनच्या प्रकल्पात ओला आणि सुका कचरा एकत्रित असला तरी त्याचे वर्गीकरण करण्याची यंत्रणा त्यात आहे. त्यामुळे नागरिकांचा त्रास या प्रकल्पामुळे कमी होणार आहे. मात्र ते करत असताना या प्रकल्पाचा खर्च नागरिकांवर पडणार नाही याची दक्षता घेण्याची गरज काँग्रेस नगरसेवकांनी व्यक्त केली.
तसेच अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांची एकत्रित प्रक्रिया केंद्र उभारतांना नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना यावेळी करण्यात आली. नगरसेविका वृषाली पाटील यांनी सभागृहात आधी झालेले प्रयोग आणि त्याचे अपयश यावर चर्चा केली. तर नगरसेवक उमर इंजिनियर यांनी गांडूळखत प्रकल्पाचे योग्य नियोजन न केल्याने त्याचा त्रास स्थानिक रहिवाशांना झाला आणि त्यातून तो प्रकल्प बंद करावा लागला. तशा प्रकारची समस्या पुन्हा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना केली.
समस्या कशी सुटेल याचा विचार करा
या विषयावर चर्चा करताना नगरसेवक निखील वाळेकर यांनी सभागृहात स्पेनच्या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देताना हा प्रकल्प अंबरनाथसाठी कसा योग्य आहे याची माहिती दिली. तर नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी या प्रकल्पातून नफा शोधण्यापेक्षा कचºयाची समस्या योग्य प्रकारे कशी सुटेल याचाच विचार करण्याची गरज व्यक्त केली. या सविस्तर चर्चेनंतर दोन्ही शहरांसाठी एकत्रित प्रकल्प राबविण्यावर एकमत करुन हा विषय मंजूर करण्यात आला.
या प्रकल्पासंदर्भात स्पष्टीकरण करतांना शहरातील कच-याच्या स्वरुपात बाहेर पडणारे बांधकाम साहित्य यावर देखील प्रक्रिया करुन त्या बांधकाम साहित्याचा पूर्णवापर करण्यात येणार आहे. त्या अनुशंगाने देखील सविस्तर माहिती देण्यात आली. मात्र हे बांधकाम साहित्यावर प्रक्रिया कशी होणार याचे स्पष्टीकरण कोणीही सभागृहात दिले नाही.
स्पेनचा प्रकल्प कसा योग्य आहे हे सांगण्याचा आटापीटा सत्ताधा-यांचा दिसत होता. तर पर्यायी प्रकल्पांचाही विचार करावा असा सुर विरोधकांमधुन बाहेर पडत होता. मात्र सत्ताधारी स्पेनच्या प्रकल्पावर ठाम असल्याने विरोधकांनी देखील विरोधाला विरोध नको म्हणून प्रकल्पाला समर्थन दर्शविले. मात्र खर्चाबाबत स्पष्टीकरण देखील मागविण्याची मागणी केली.