अंबरनाथच्या गिर्यारोहकांनी केला वानरलिंगी सुळका सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 10:54 PM2019-11-20T22:54:57+5:302019-11-20T22:55:00+5:30
दोन तास ३७ मिनिटांचा कालावधी; प्रतिकूल परिस्थितीवर मात
बदलापूर : वानरलिंगी (खडापारसी) किल्ले जीवधनच्या डाव्या अंगाला लागून असलेल्या माळशेज घाटाच्या कुशीतले काही दुर्गम आणि बेलगाम सुळक्यांपैकी एक. येथे धडकायची हिम्मत फक्त वाऱ्याला आणि उतरायची मुभा फक्त पाण्याला. अतिशय अवघड असलेल्या केवळ प्रशिक्षित आणि मुरलेल्या गिर्यारोहकानेच हिम्मत करावी, असा हा सुळका प्रतिकूल परिस्थितीत सर करण्याची किमया केली आहे वाइल्ड विंग्स संस्थेच्या स्वप्नील साळुंके आणि रोशन भोईर यांनी. हे दोघेही तरुण अंबरनाथमध्ये राहणारे आहेत.
अतिकठीण श्रेणीत गणला जाणारा हा वानरलिंगी सुळका ४०० फूट उंच असून याआधी एस.सी.आय. या गिर्यारोहक संस्थेद्वारे त्यावर गिर्यारोहण करण्यासाठी ६२ ठिकाणी बोल्ट लावण्यात आले आहेत. लिंगाणा, तैल-बैला, डुक्स नोज, भैरवगड, सरसगड-वॉल यासारख्या सुळक्यांवर चढाई केल्यानंतर आतुरता होती ती नवीन एका मोहिमेची. गणेश गिध आणि रोहित वर्तक यांनी केलेल्या सेव्हन समीट यातील वानरलिंगी (खडापारसी) सुळका सर करायचा, असे ठरवले. स्वप्नीलच्या या संकल्पनेला बळ दिले ते त्याच्यासोबत या मोहिमेत असणाºया रोशन भोईर आणि वाइल्ड विंग्सच्या सदस्यांनी.
प्रश्न होता तो कधी, आॅक्टोबरमध्ये करायचा ठरले पण पाऊस मात्र थांबायचे नाव घेत नसल्याने मोहीम नोव्हेंबरमध्ये केली. सकाळी ७ वाजता चढाईला सुरुवात करायचे ठरले, पण धुके आणि थंडीमुळे ७ वाजताची चढाई १० वर गेली. गिर्यारोहणाचे साहित्य आणि गडदेवतांची पूजा करून चढाईला सुरुवात केली गेली. वानरलिंगी सुळका चढायला २ तास ३७ मिनिटे लागली. पावसाळ्यानंतर अशा प्रकारचे सुळके चढण्यासाठी घातक आणि कठीण असते. याआधी हा सुळका सर झाला आहे. पण असे सुळके पावसानंतर वारा, पाणी खाऊन आपले रूप बदलतात. अशावेळी सुळके सर करताना माती, दगड कोसळून जीवावर बेतू शकते. मात्र स्वप्नील, रोशनने हे आव्हान अगदी सहज स्वीकारले. या मोहिमेत समीर चिकने, अनंत यादव, मधुर धनावडे, श्रीधर वालम, तानाजी लाड, हरीश जाधव, अक्षय यादव, ओंकार यादव, राजू म्हसे यांचा समावेश होता.
आयुष्यात काहीतरी वेगळे हवे म्हणून गिर्यारोहणाला सुरुवात केली. पुढे काही अशा व्यक्ती मिळत गेल्या, ज्यामुळे आयुष्यच बदलून गेले. काम आणि भटकंतीचा समन्वय साधत सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळू लागलो. काही अशा व्यक्ती मिळाल्या, त्यांचे मार्गदर्शन मिळाले.
- स्वप्नील साळुंके, गिर्यारोहक