'लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत...' आव्हाडांची आंबेडकरांना भावनिक साद
By अजित मांडके | Published: March 4, 2024 05:21 PM2024-03-04T17:21:07+5:302024-03-04T17:22:11+5:30
महाविकास आघाडीसोबत अद्याप युती झाली नसल्याने त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात वंचितच्या कार्यकर्त्यांनी जाऊ नये असे आवाहन डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
अजित मांडके, ठाणे : महाविकास आघाडीसोबत अद्याप युती झाली नसल्याने त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात वंचितच्या कार्यकर्त्यांनी जाऊ नये असे आवाहन डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तसेच अद्यापही महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबत त्यांनी आपला निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडी सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्राद्वारे त्यांना भावनिक आवाहन केले आहे. लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल यासाठी आपण प्रयत्न करुया असे आव्हाड यांनी त्या पत्रात नमुद केले आहे.
महाविकास आघाडी सोबत जायचे किंवा नाही, याबाबत वंचितचे आजही तळ्यात मळ्यात वातावरण आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे चित्रही अद्याप स्पष्ट होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आंबेडकरांना आपलेसे करण्यासाठी आव्हाड हे आता मैदानात उतरले असून त्यांनी आंबेडकरांना भावनिक साद घातली आहे. मी शिव, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रचार - प्रसार व्हावा आणि जनमाणसात पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम, आपुलकी, माया निर्माण व्हावी, यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो. मी जरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी माझ्या काही वैयक्तीक भुमिका आहेत. महाराष्ट्राची पुरोगामी विचारधार जोपासणारे अनेक नेते आहेत. त्यातील महत्वाचे नते म्हणून म्हणजेच आपल्याकडे पाहिले जात आहे.
तुमच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे. या वारसाचा पूर्ण सन्मान ठेवून मी त्यांना एकच विनंती करतो की तुमचे ध्येय आणि आमचे ध्येय एकच आहे. ते म्हणजे संविधान वाचविणे आणि देशातील लोकशाही कशी सुरक्षित राहिल, यासाठी प्रयत्न करणे, त्यासाठी वाटेल ती किमंत मोजायला मी तरी तयार आहे. आपणही याच विचारांचे आहात, संविधान आणि लोकशाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेले अमुल्य धन आहे. जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल यासाठी आपण प्रयत्न करुया असे आव्हाड यांनी त्या पत्रात नमुद केले आहे.