रिक्षातळांमुळे अंबरनाथ गुदमरले , परिसरातून नागरिकांना चालणेही झाले अवघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 04:20 AM2018-09-26T04:20:47+5:302018-09-26T04:21:00+5:30
रिक्षापरवाने मोठ्या प्रमाणात दिल्याने अंबरनाथमध्ये रिक्षांची संख्या दुप्पट झाली आहे. मात्र या रिक्षा उभ्या करण्यासाठी तळावर जागा अपुरी पडत असल्याने मिळेल तिथे तळ सुरू करण्यात आले आहे.
अंबरनाथ - रिक्षापरवाने मोठ्या प्रमाणात दिल्याने अंबरनाथमध्ये रिक्षांची संख्या दुप्पट झाली आहे. मात्र या रिक्षा उभ्या करण्यासाठी तळावर जागा अपुरी पडत असल्याने मिळेल तिथे तळ सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानक परिसर हा रिक्षातळानेच गजबजलेला आहे. अशा परिस्थितीत इतर वाहनांसाठी जागाच शिल्लक राहत नसल्याने चालक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
अंबरनाथमध्ये पूर्वी सरासरी तीन हजार रिक्षांची नोंद होती. त्यात काही भंगारात निघालेल्या रिक्षांचाही समावेश होता. मात्र वर्षभरात रिक्षा परवाने सुरू झाल्यावर या रिक्षांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. आजच्याघडीला शहरात पाच हजारावर रिक्षा आहेत. मात्र रिक्षांची संख्या अचानक वाढल्याने या रिक्षांसाठी तळ अपुरे पडत आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांनीही मिळेल तिथे रिक्षा उभे करण्यास सुरूवात केली आहे. अंबरनाथ पश्चिम भागाचा विचार करता मुख्य रिक्षातळासोबत स्थानकात येणाऱ्या आणि जाणाºया रस्त्यावरही प्रत्येकी दोन - दोन रिक्षातळ उभे केले आहेत. दुकानांच्या बाजूने एक तळ आणि रस्ता दुभाजकाच्या बाजूने एक असे दोन तळ एकाच रस्त्यावर आहेत. स्थानकाकडे येणाºया आणि जाणाºया रस्त्यावर दोन्ही ठिकाणी हीच परिस्थिती असल्याने दोन तळाच्यामधून केवळ एकच रिक्षा जाईल इतकीच जागा शिल्लक राहत आहे.
शहरातील मुख्य रस्त्याची ही अवस्था असल्याने स्थानक परिसरात इतर वाहने गेल्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. इतर वाहनांना रिक्षाचालक जाण्यासाठी जागाच देत नसल्याने ही कोंडी अधिकच वाढली आहे. ज्या स्टेशन रोडवर इतर वाहने पोहचणे शक्य होत नाही त्याच रस्त्यावर एखादे वाहन गेल्यास त्या वाहनाला वळण घेण्यासाठी जागाच राहत नाही. प्रत्येक मोकळया रस्त्यावर रिक्षातळ सुरू झाल्याने रिक्षा चालकांच्या तावडीतून सुटण्यासाठी इतर वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते.
पश्चिम भागाची जी अवस्था आहे तशीच पूर्वेतही आहे. शहरातील सर्वाधिक रहदारी असलेला रस्ता म्हणजे बी केबीन रोड. मात्र या रस्त्यावर मोहन कॅफे ते हनुमान मंदिरापर्यंतचा रस्ता हा पूर्णपणे रिक्षाचालकांनी बळकावला आहे. आधीच रस्ता अरूंद आणि त्यात दोन्ही बाजूला रिक्षातळ सुरू झाल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. एके काळी या रस्त्यावर खाजगी बस उभ्या राहत होत्या. मात्र आज रिक्षांची संख्या इतकी झाली आहे की या ठिकाणी लहान गाडी नेणेही कठीण जात आहे. रिक्षाचालकांनी बेकायदा तळ उभारल्याने त्यांच्या मुजोरीला आणि दादागिरीला सामोरे जातच इतर वाहनचालकांना या रस्त्यावरून मार्ग काढावा लागतो.
दुकानदारांशी वाद
हीच परिस्थिती शिवाजी चौकात आहे. या चौकातील रिक्षाची रांग ही स्टेट बँकेपर्यंत जात असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्रत्येक दुकानासमोर रिक्षा उभ्या राहत असल्याने रिक्षाचालक आणि दुकानदार यांच्यात वाद होतात.
अंबरनाथमधील रिक्षाचालकांच्या संख्येत वाढ झालेली असताना त्यांचे नियोजन करण्यासाठी वाहतूक विभाग आणि स्थानिक पालिका प्रशासनाकडे कोणतीच यंत्रणा नाही. रिक्षाचालकांनी बेकायदा रिक्षातळ उभारताना नागरिकांच्या त्रासाकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच स्थानक परिसरातच एकाच वेळी गर्दी होत असल्याने त्याचा त्रास प्रामाणिक रिक्षाचालकांनाही होत आहे. वाहतूक पोलिसांनी वेळीच या रिक्षातळांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
रिक्षांची वाढलेली संख्या ही पालिकेसाठी त्रासदायक आहे. एकाच ठिकाणी सर्व रिक्षा येत असल्याने मुख्यतळ अपुरा पडत आहे. त्यांना पर्यायी जागा कुठे देता येईल, याचा विचार सुरू आहे. या संदर्भात रिक्षा संघटनेसोबत चर्चा सुरू आहे.
- देविदास पवार, मुख्याधिकारी.