अंबरनाथ-बदलापूरची निवडणूक पुन्हा लांबणीवर; कोरोनाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 12:37 AM2021-03-27T00:37:16+5:302021-03-27T00:37:24+5:30
अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, त्याच काळात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने ती पुढे ढकलण्यात आली
अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही शहरांत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने अशा परिस्थितीत निवडणूक घेणे अशक्य मानले जात आहे. त्यातच राज्य शासन यासंदर्भात ठोस निर्णय घेण्यास तयार नसल्याने अनिश्चित काळासाठी ही निवडणूक पुढे जाण्याचे संकेत आहेत.
अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, त्याच काळात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने ती पुढे ढकलण्यात आली. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात कोरोनारुग्णांची संख्या घटू लागल्याने फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, त्या काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्याने त्यावेळेसही अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयोगाने मतदारयादीचे काम हाती घेतले होते.
तेदेखील अंतिम टप्प्यात असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने हे कामदेखील अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने मतदारयादी जाहीर न केल्याने आता पालिकेच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे जाणार, हे निश्चित झाले आहे. १७ मार्च रोजी अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेने आपल्या मतदारयाद्या निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केल्या आहेत. मतदारयादी जाहीर झाल्यानंतर निवडणूक होणे क्रमप्राप्त असल्याने आयोगाने ही मतदारयादी जाहीर केलेली नाही. ती जाहीर होत नसल्याने नेमकी निवडणूक होणार कधी, असा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांना पडला आहे. खरेतर निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. माऋ, वर्ष उलटले तरी होत नसल्याने आता राजकीय पक्षदेखील निवडणूक प्रचारापासून लांब असलेले दिसत आहेत.