अंबरनाथ, बदलापूरला शिवसेनेचे नगराध्यक्ष, वाळेकर, राऊतांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 02:36 AM2017-11-20T02:36:20+5:302017-11-20T02:36:27+5:30

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगराध्यक्षपदांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

Ambernath, Badlapur, Shivsena's mayor, Vallekar, Rauta's choice | अंबरनाथ, बदलापूरला शिवसेनेचे नगराध्यक्ष, वाळेकर, राऊतांची निवड

अंबरनाथ, बदलापूरला शिवसेनेचे नगराध्यक्ष, वाळेकर, राऊतांची निवड

googlenewsNext

अंबरनाथ/बदलापूर :अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगराध्यक्षपदांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. दोन्ही पालिकांमध्ये शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. अंबरनाथमध्ये मनीषा वाळेकर, तर बदलापूरमध्ये विजया राऊत यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागणार आहे.
अंबरनाथ आणि बदलापूरच्या नगराध्यक्षपदांसाठी २१ नोव्हेंबरला निवडणूक घेण्यात येणार होती. शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अंबरनाथमधून वाळेकर, तर बदलापूरमधून राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोन्ही पालिकांमध्ये भाजपा आपला उमेदवार उभा करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. अंबरनाथमध्ये भाजपाने आपला उमेदवार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्तेची गणिते शिवसेनेच्या बाजूने झुकत असल्याचे पाहून भाजपाने शेवटच्याक्षणी उमेदवारी न देता थेट सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला.
भाजपा शिवसेनेच्या काही फुटीर नगरसेवकांना घेऊन सत्तेचे गणित रचत असल्याचे पाहून शिवसेनेने काँग्रेसला आमंत्रण दिले. अंबरनाथमधील काँग्रेस शिवसेनेसोबत गेल्याचे पाहून भाजपाने नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेत शिवसेनेला समर्थन जाहीर केले. या राजकीय खेळीमुळे शिवसेनेला नगराध्यक्षपद सहजरीत्या शाबूत ठेवता आले. शिवसेना आणि काँग्रेस यांचा घरोबा झाल्याने आता अंबरनाथ नगरपालिकेत विरोधी पक्षाची भूमिका कोण बजावणार, याची उत्सुकता लागली आहे.
शिवसेनेने काँग्रेसला सोबत घेतल्याने उपनगराध्यक्षपद हे काँग्रेसला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अंबरनाथची राजकीय परिस्थिती पाहता सद्य:स्थितीत पालिकेत सर्वच पक्ष सत्ताधारी म्हणून पुढे आले आहेत. अंबरनाथमध्ये वाळेकर गटाच्या वाट्याला नगराध्यक्षपद गेल्याने वारिंगे गटात नाराजीचा सूर उमटला होता. पक्षाचा आदेश मान्य असला, तरी आम्हाला विश्वासात घेतले नाही, अशी ओरड वारिंगे गटाकडून केली जात होती. शिवसेनेत नगरसेवक फुटू नये, म्हणून सर्वच्या सर्व नगरसेवकांना आपल्या नजरकैदेत ठेवले होते. शिवसेनेतील नाराज गटाला सोबत घेऊन भाजपाने काही नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्नदेखील केला होता. मात्र, त्यांचे मनसुबे उधळून लावण्याचे काम शिवसेनेच्या नगरसेवक, नेत्यांनी केले आहे. अनेक दिवसांपासून असलेले तणावाचे वातावरण नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर थंड झाले आहे.
दुसरीकडे बदलापूरमध्येही निवडणुकीत चुरस पाहायला मिळाली. या ठिकाणीही भाजपा शिवसेनेच्या नाराज गटाला सोबत घेऊन सत्तेचे स्वप्न पाहत होती. मात्र, शिवसेनेच्या अंतर्गत वादाला पूर्णविराम मिळताच भाजपाने आपली रणनीती बदलली. शिवसेनेने आपले वाद परस्पर मिटवून घेतल्याने याठिकाणी निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झाले.
>दरम्यान, भाजपाने आपली भूमिका स्पष्ट करत युतीचा धर्म पाळल्याचे स्पष्ट केले आहे. शहरप्रमुख संभाजी शिंदे यांनी ठरल्याप्रमाणे आम्ही शिवसेनेला मदत केल्याचे सांगितले. शिवसेना आणि भाजपा एकत्रित बदलापूरच्या विकासासाठी सहकार्य करेल, असेही ते म्हणाले. शिवसेनेने केलेल्या कामाच्या जोरावरच या पालिकेत सेनेचे निर्विवाद वर्चस्व असल्याचे मत शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Ambernath, Badlapur, Shivsena's mayor, Vallekar, Rauta's choice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.