Ambernath:...पण वेळ आली नव्हती, मातीचा ढिगारा कोसळल्याने खड्ड्यात अडकलेल्या मजुरांची सुखरूप सुटका
By पंकज पाटील | Updated: September 6, 2023 17:46 IST2023-09-06T17:46:02+5:302023-09-06T17:46:28+5:30
Ambernath: अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात महानगर गॅसच्या लाईनीचे दुरुस्तीचे काम करीत असताना खोदण्यात आलेल्या 15 फूट खोल खड्ड्यात मातीचा ढिगारा पडल्याने खड्ड्यात काम करणारे तीनही कामगार मातीच्या ढिगार्यात रुतले होते.

Ambernath:...पण वेळ आली नव्हती, मातीचा ढिगारा कोसळल्याने खड्ड्यात अडकलेल्या मजुरांची सुखरूप सुटका
- पंकज पाटील
अंबरनाथ - अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात महानगर गॅसच्या लाईनीचे दुरुस्तीचे काम करीत असताना खोदण्यात आलेल्या 15 फूट खोल खड्ड्यात मातीचा ढिगारा पडल्याने खड्ड्यात काम करणारे तीनही कामगार मातीच्या ढिगार्यात रुतले होते. अग्निशामक दलाच्या मदतीने या तीनही कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे आणि त्यांना उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फॉरेस्ट नाका येथे महानगर गॅसचे मोठे स्टेशन असून या ठिकाणावरून संपूर्ण शहराला महानगर गॅसचा पुरवठा केला जातो. या स्टेशनवर येणारी मुख्य महानगर गॅसची लाईन दुरुस्तीचे काम करीत असताना 15 फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्यातील भले मोठे दगड देखील बाहेर काढून ठेवण्यात आले होते. खड्डा खोदत असतानाच रस्त्याच्या वरती ठेवण्यात आलेल्या मातीचा ढिगारा अचानक कोसळला आणि खड्ड्यात काम करणाऱ्या तीन कामगारांच्या अंगावर पडला.
या मातीसोबत भले मोठे दगड देखील पडल्याने हे तीनही कामगार कमरेपर्यंत मातीत रुतले होते. सुरेश मोरे, कालीचंद्र आणि लक्ष्मण यमकर असे तीनही कामगारांचे नाव असून त्या तीनही कामगारांना वाचवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना प्रयत्न करावे लागले. खड्ड्यात पडलेले भले मोठे दगड जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून मातीचा ढिगारा अलगदपणे काढण्यात आला आणि त्यानंतर त्या कामगारांना सुखरूप पणे बाहेर करण्यात आले आहे. महानगर गॅसच्या लाईनच्या दुरुस्तीचे काम करताना कामगारांना सुरक्षेची साधने न पुरवल्याने आता महानगर गॅस च्या विरोधात देखील संताप व्यक्त होत आहे.