अंबरनाथ पालिकेचा अर्धवट अवस्थेतील क्रीडा संकुल झाले मद्यपींचा अड्डा
By पंकज पाटील | Published: August 17, 2023 07:12 PM2023-08-17T19:12:22+5:302023-08-17T19:12:30+5:30
अर्धवट अवस्थेतील या क्रीडा संकुलामध्ये रात्रीच नव्हे तर दिवसादेखील काही तळीराम दारू पिण्याचा आनंद घेत आहेत
अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेने 10 कोटींचा क्रीडा संकुल प्रकल्प हाती घेतला होता. मात्र ठेकेदाराने हे काम वेळीच न केल्याने त्या ठेकेदाराकडून काम काढून घेण्यात आले आहे. मात्र काम काढून घेतल्यानंतर पुन्हा नव्या ठेकेदाराची नेमणूक न केल्याने अर्धवट अवस्थेतील हे क्रीडा संकुल आता मद्यपिंचा अड्डा झाला आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने पश्चिम भागातील नेताजी मैदानावर इंडोर स्टेडियम उभारण्याचे काम हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यात इंडोर स्टेडियम साठी 10 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. हे काम ज्या ठेकेदारा मार्फत सुरू होते त्या ठेकेदाराने काम वेळीच पूर्ण न केल्याने अर्धवट अवस्थेत असलेल्या या क्रीडा संकुलाचे काम थांबविण्यात आले. एवढेच नव्हे तर अंबरनाथ नगर पालिकेने संबंधित ठेकेदाराकडून काम काढून घेत नव्या ठेकेदाराचा शोध सुरू केला आहे. गेल्या वर्षभरापासून या बंदिस्त स्टेडियमचे काम रखडलेल्या अवस्थेत आहे. या कामाच्या मोबदल्यात पालिकेने संबंधित ठेकेदाराला तब्बल चार कोटीहून अधिकचा निधी वर्ग देखील केला आहे. मात्र काम पूर्णत्वास न गेल्यामुळे हे क्रीडा संकुल आता भकास होऊ लागले आहे. नगर पालिकेच्या फसलेल्या प्रकल्पांपैकी एक असा हा क्रीडा संकुल पालिकेला त्रासदायक ठवू लागला आहे.
क्रीडा संकुल मद्यपींचा अड्डा: अर्धवट अवस्थेतील या क्रीडा संकुलामध्ये रात्रीच नव्हे तर दिवसादेखील काही तळीराम दारू पिण्याचा आनंद घेत आहेत. एवढेच नव्हे तर नशा करणारे तरुण देखील या ठिकाणी दिवस-रात्र बसून राहत आहेत.
लोखंडी सळई गंजल्या: इमारत गेल्या वर्षभरापासून ऊन, वारा, पाऊस झेलत असल्यामुळे या अर्धवट इमारतीचे अनेक सळई आता गंजू लागल्या आहेत. त्यामुळे भविष्यात हे काम पूर्ण करताना या गंजलेल्या सळई इमारतीला धोका निर्माण करू शकते.
सर्वत्र घाणीचे साम्राज्य: ज्या भल्या मोठ्या मैदानावर इंडो स्टेडियम उभारले जाणार होते त्या अर्धवट अवस्थेतील इमारती भोवती प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. एवढेच नव्हे तर उर्वरित सर्व बांधकाम साहित्य देखील परिसरातील नागरिकांनी उचलून नेला आहे.
मैदानाची लागली वाट: ज्या ठिकाणी हे बंदिस्तक क्रीडा संकुल उभारले जात आहे त्या क्रीडा संकुलामुळे मैदान अरुंद झाले आहे. एका फसलेल्या प्रकल्पामुळे मैदानाची वाताहत झाली आहे.