अंबरनाथ गोळीबार प्रकरणाला राजकीय वळण; आरोपीच्या यादीत माजी नगरसेवक

By पंकज पाटील | Published: November 14, 2022 07:10 PM2022-11-14T19:10:20+5:302022-11-14T19:10:52+5:30

कल्याणच्या आडीवली गावातील बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यावर रविवारी दुपारी अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसीत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता.

Ambernath firing case turns political; Ex-corporator of kdmc municipal corporation in accused list | अंबरनाथ गोळीबार प्रकरणाला राजकीय वळण; आरोपीच्या यादीत माजी नगरसेवक

अंबरनाथ गोळीबार प्रकरणाला राजकीय वळण; आरोपीच्या यादीत माजी नगरसेवक

googlenewsNext

पंकज पाटील 

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीमधील वादामुळे जो गोळीबार झाला होता त्या गोळीबार प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. पंढरीनाथ फडके समर्थकांनी गोळीबार केलेले समोर असताना देखील या प्रकरणात थेट कल्याण डोंबिवलीच्या माजी नगरसेवक कुणाल पाटील याना आरोपी करण्यात आले आहे. गोळीबाराच्या घटनेत कुणाल पाटील हे घटनास्थळी नसताना देखील त्यांचे नाव आरोपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर टाकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.      

कल्याणच्या आडीवली गावातील बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यावर रविवारी दुपारी अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसीत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. पनवेलच्या पंढरीनाथ फडके यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. राहुल पाटील आणि पंढरीनाथ फडके यांच्यात बैलगाडा शर्यतीवरून वाद असल्यामुळे हा हल्ला त्याच वादातून झाल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर हा हल्ला राजकीय स्पर्धेतून करण्यात आल्याचे करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राहुल पाटील हे केडीएमसीच्या आडीवली प्रभागातून बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातर्फे निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे त्याच प्रभागातील माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचे त्यांच्याशी राजकीय वैमनस्य निर्माण झाले आहे. त्यातच राहुल पाटील आणि पंढरीनाथ फडके यांच्यात बैलगाडा शर्यतीवरून सुरू असलेल्या वादाचा फायदा घेत कुणाल पाटील आणि पंढरीनाथ फडके यांनी मिळून हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप राहुल पाटील यांनी त्यांच्या जबाबात केला. त्यामुळे पोलिसांनी केडीएमसीचे माजी नगरसेवक कुणाल पाटील, महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांच्यासह एकूण ३२ जणांविरोधात हत्येचा प्रयत्न, कट रचणे आणि हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. मात्र हा गुन्हा दाखल करताना देखील पोलिसांनी मुख्य आरोपीच्या यादीत कुणाल पाटील यांचे नाव पहिल्या क्रमांकावर ठेवले आहे. पंढरीनाथ फडके आणि त्यांच्या समर्थकांनी गोळीबार केल्याचे समोर आलेले असताना देखील फडके यांना आरोपीच्या पहिल्या यादीत न ठेवता थेट कुणाल पाटील यांनाच त्या यादी समाविष्ट केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र या संदर्भात पोलीस काहीही बोलण्यास तयार नाहीत. अंबरनाथच्या गोळीबार प्रकरणामुळे कल्याण डोंबिवलीतील राजकीय ढवळून निघाले आहे. दरम्यान गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांना उल्हासनगर न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्यासह अटक करण्यात आलेल्या एकनाथ फडके आणि हरिश्चंद्र फडके यांनाही न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या घटनेत फक्त आमच्याच बाजूने नव्हे, तर राहुल पाटील यांच्या बाजूनेही आमच्यावर गोळीबार करण्यात आला, मात्र पोलिसांनी फक्त राहुल पाटील यांच्या तक्रारीवरून आपल्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आपली तक्रार घेतली नसल्याची तक्रार पंढरीनाथ फडके यांनी त्यांचे वकील ऍड. सत्यन पिल्ले यांच्यामार्फत न्यायालयाकडे केली. त्यावर न्यायालयाने पोलिसांचं म्हणणं मागवलं असून त्यानुसार आता पुढील कारवाई होणार आहे.
 

Web Title: Ambernath firing case turns political; Ex-corporator of kdmc municipal corporation in accused list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.