अंबरनाथ : खराब रस्त्यांविरोधात मनसेची अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 02:00 AM2017-10-13T02:00:38+5:302017-10-13T02:00:52+5:30
येथील शिवाजी चौक ते वडवली रस्त्याची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांचे साम्राज्य यांचा निषेध करण्यासाठी मनसेने पालिका प्रशासनाची गुरुवारी प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली
अंबरनाथ : येथील शिवाजी चौक ते वडवली रस्त्याची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांचे साम्राज्य यांचा निषेध करण्यासाठी मनसेने पालिका प्रशासनाची गुरुवारी प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. शिवाजी चौकात मनसे कार्यकर्त्यांनी पालिकेविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शहरात अनेक रस्त्यांची अवस्था ही बिकट झाली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिका प्रशासन ठोस उपाययोजना आखत नसल्याचे समोर आले आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीकडे पालिका दुर्लक्ष करत आहे.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिवाजी चौक ते वडवली रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. या रस्त्याची अवस्था धोकादायक झाली आहे. शिवाजी चौकातील चढणावर गाडी चालवणे मोठी कसरत झाली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेला पालिका प्रशासन जबाबदार असल्याने मनसेने अचानक पालिकेची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून पालिकेचा निषेध व्यक्त केला.