छुप्या जीन्स वॉश कारखान्यांवर अंबरनाथ पालिकेची कारवाई; ना्ल्यात सोडत होते पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 12:06 AM2021-01-29T00:06:01+5:302021-01-29T00:06:26+5:30
वालधुनीसह नाल्यात सोडत होते पाणी : कंपन्यांना दिल्या होत्या नोटिसा
अंबरनाथ : अंबरनाथ शहरात रासायनिक कंपन्यांसह, आनंदनगर एमआयडीसीला लागूनच पाच ठिकाणी जीन्स वॉश कारखाने सुरू असल्याचे नगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ अर्थात एमपीसीबीच्या संयुक्त कारवाईत समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे सर्वपक्षीय राजकीय आश्रयातूनच हे कारखाने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या जीन्स कारखान्यांवर कारवाई झाली असली तरी त्यांना संरक्षण देणाऱ्या पुढाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथमध्ये वालधुनीतील रासायनिक पाण्यातून उद्भवणारे जल आणि वायू प्रदूषणाच्या मुद्यामुळे एमपीसीबीकडून आनंदनगर एमआयडीसीतील कंपन्यांची झाडाझडती सुरू होती. गेल्या दोन महिन्यांत जवळपास ६८ कंपन्यांना एमपीसीबीने नोटिसा बजावल्या होत्या. या घटनेनंतर वालधुनीच्या पात्रात उग्र दर्प असलेले रसायन सोडल्याचे प्रकरण नुकतेच समोर आल्याने, रासायनिक कंपन्या आणि रसायन सोडणाऱ्या टँकर लॉबी एमपीसीबी आणि प्रशासकीय यंत्रणांना घाबरत नसल्याचे समोर आले होते. एकीकडे रासायनिक कंपन्या जल प्रदूषण करत असताना, दुसरीकडे गेल्या दोन वर्षांपासून बंदी असलेले जीन्स वॉश कारखाने याच भागात बिनधास्त सुरू असून, जीन्स वॉशचे पाणी थेट वालधुनी आणि नाल्यांमध्ये सोडले जात आहेत. पर्यावरण सचिवांनी अंबरनाथमधील प्रदूषणाची पाहणी केल्यानंतर नगरपालिका हद्दीतील जीन्स वॉश कारखाने शोधून काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या आदेशानंतर उपमुख्याधिकारी धीरल चव्हाण, नरेंद्र संखे तसेच पालिका कर्मचारी आणि एमपीसीबीच्या कर्मचाऱ्यांनी अंबरनाथ येथील लोकनगरी, शिवाजीनगर, एमआयडीसी रोड, पेट्रोल पंपजवळ आणि दीपक नगरसह पाच ठिकाणी छुप्या पद्धतीने विनापरवाना सुरू असलेल्या जीन्स वॉश कारखान्यांवर छापा टाकत कारवाई केली आहे.
प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडले नाल्यात
छापा टाकलेल्या कारखान्यांतून कुठलीही प्रक्रीया न करता सांडपाणी नाल्यात सोडले जात असून अनेक ठिकाणी हे पाणी जमिनीत मुरवले जात होते. या पाण्याचे नमुने एमपीसीबीने तपासासाठी घेतले आहे. ते तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. पाण्याच्या अहवालानंतर या कारखान्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे एमपीसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले.