अंबरनाथ नगरपालिकेला हवा पूर्णवेळ मुख्याधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:38 AM2021-03-24T04:38:50+5:302021-03-24T04:38:50+5:30
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना या ठिकाणी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांची कमतरता भासत आहे. एवढेच ...
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना या ठिकाणी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांची कमतरता भासत आहे. एवढेच नव्हेतर, अंबरनाथला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने पालिकेचा कारभार सांभाळणे अवघड झाले आहे.
वर्षभरापूर्वी अंबरनाथमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण पालिका प्रशासन कोरोना नियंत्रणावर काम करीत होते. अशा परिस्थितीत शहरातील इतर सर्व विकासकामांवर दुर्लक्षदेखील झाले. मात्र, कोरोनावर नियंत्रण मिळवणे हेच सर्वांचे लक्ष झाल्याने त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. कोरोनावर प्रभावीपणे काम करण्यासाठी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांची अंबरनाथ नगरपालिकेत नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली कोरोनावर कामही करण्यात आले. कोरोनाची लाट कमी झाल्यानंतर प्रशासकीय कामांकडे अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले. मात्र, आता महिन्याभरापासून कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने कोरोना नियंत्रणासाठी पुन्हा अधिकाऱ्यांची फळी कामाला लावणे गरजेचे ठरले आहे. मात्र, मुख्याधिकारी रसाळ यांच्याकडे अंबरनाथ पालिकेचा तात्पुरता पदभार देण्यात आल्याने त्यांना अंबरनाथ शहराच्या कोरोनावरील कामकाजासाठी पूर्ण वेळ देणे शक्य होत नाही. रसाळ यांची बदली कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पावर करण्यात आल्याने त्या ठिकाणी सर्वाधिक वेळ देणे बंधनकारक झाले आहे.
तो पदभार सांभाळून अंबरनाथ पालिकेचा अतिरिक्त कारभार त्यांना सांभाळावा लागत आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणचे कामकाज पाहणे अवघड झाले आहे. अंबरनाथमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अंबरनाथ शहरात पूर्णवेळ मुख्य अधिकाऱ्यांची गरज भासणार असून, प्रशासनाने त्याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.