अंबरनाथ नगरपालिका : बेकायदा इमारतीला अधिकाºयांचे संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 06:53 AM2018-03-09T06:53:58+5:302018-03-09T06:53:58+5:30
बेकायदा झोपड्या आणि चाळी उभारणे, हे अंबरनाथ पालिका हद्दीत सहज शक्य आहे. मात्र, आता चाळींसोबत अंबरनाथमध्ये तीन मजली इमारत बेकायदा उभारण्यात आली आहे. रस्त्याला लागून ही इमारत उभारलेली असतानाही पालिकेचे अधिकारी कारवाईसाठी त्या ठिकाणी फिरकलेच नाही.
अंबरनाथ - बेकायदा झोपड्या आणि चाळी उभारणे, हे अंबरनाथ पालिका हद्दीत सहज शक्य आहे. मात्र, आता चाळींसोबत अंबरनाथमध्ये तीन मजली इमारत बेकायदा उभारण्यात आली आहे. रस्त्याला लागून ही इमारत उभारलेली असतानाही पालिकेचे अधिकारी कारवाईसाठी त्या ठिकाणी फिरकलेच नाही. अखेर, एका बड्या नेत्याने याप्रकरणी तोंडी तक्रार करताच कारवाईचा दिखावा करण्यात पालिकेचा अतिक्रमणविरोधी विभाग कुठेच कमी पडला नाही. इमारत तशीच ठेवत केवळ दोनचार भिंतींना भगदाड पाडून निघून गेले.
अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाºया उड्डाणपुलाला लागूनच साईबाबा मंदिराशेजारी दोन इमारतींच्या मध्यभागी मोकळी जागा होती. रस्त्याला लागूनच असल्याने एका विकासकाने थेट ही जागा ताब्यात घेत त्या ठिकाणी पालिकेची कोणतीच परवानगी न घेता थेट तीन मजली इमारत उभी केली. अत्यंत अडचणीच्या ठिकाणी ही इमारत उभी केली आहे. या इमारतीला जिना हा शेजारील इमारतीतून देण्यात आला आहे.
शहराला जोडणाºया महत्त्वाच्या रस्त्यावर मोठी इमारत उभी केली जात असताना नगरपालिकेचा अतिक्रमणविरोधी विभाग मात्र केवळ बघ्याच्या भूमिकेत होता. ही इमारत बेकायदा उभी राहत असल्याची माहिती अतिक्रमण विभागाला असताना एकदाही या ठिकाणी कोणता अधिकारी फिरकला नाही. संपूर्ण इमारत उभी राहिल्यावर त्याची तक्रार अंबरनाथमधील एका बड्या राजकीय नेत्याने पालिका अधिकाºयांकडे केली.
तक्रार आली तर कारवाई दाखवावी लागेल, या हेतूने पालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने लागलीच त्या इमारतीच्या दोन ते तीन भिंतींना भगदाड पाडत कारवाईचा फार्स केला. कारवाई झाल्याची नोंद करून पालिकेचे अधिकारी निघून गेले.
अतिक्रमणासंदर्भात तक्रार आल्यावर पालिकेने कारवाई करण्यासोबत संबंधितांवर गुन्हे दाखल करणे अपेक्षित होते. मात्र, पालिकेने कारवाईचा फार्स करून संरक्षण देण्याचे काम केले आहे. तात्पुरती कारवाई झाल्यावर त्या इमारतीवर ठोस कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, ती कारवाईदेखील पालिकेने केलेली नाही. या अतिक्रमणाची कोणतीच माहिती नगररचना विभागाला देण्यात आलेली नाही. या इमारतीचा कोणताही प्रस्ताव मंजुरीसाठी पालिकेकडे नाही. असे असतानाही कारवाईसाठी केवळ चालढकल केली जात आहे. अतिक्रमणांबाबत योग्य कारवाई व्हावी, यासाठी पालिकेने दोन वर्षांपूर्वी अधिकाºयांची नेमणूक करून त्यांचे अधिकार निश्चित केले होते. त्यांच्या प्रभागात अतिक्रमण झाल्यास त्याला संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असे स्पष्ट केले होते. मात्र, अंबरनाथ पालिकेतील अतिक्रमण विभागाचे अधिकारी अतिक्रमण रोखणे तर दूरच त्या अतिक्रमणांना संरक्षण देण्याचेच काम करत आहेत. त्यामुळे या अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.