राष्ट्रीय स्पर्धेत अंबरनाथच्या खेळाडूला सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:47 AM2021-02-17T04:47:57+5:302021-02-17T04:47:57+5:30
अंबरनाथ : गुवाहाटी येथे झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत अंबरनाथचा १५ वर्षीय खेळाडू आशिष यादव याने ...
अंबरनाथ : गुवाहाटी येथे झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत अंबरनाथचा १५ वर्षीय खेळाडू आशिष यादव याने ५ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. आशिषवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अंबरनाथ (प) येथील जावसई परिसरात आशिष कुटुंबासह राहतो. त्याची कौटुंबिक परिस्थिती गरिबीची असून वडील हे उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवितात तसेच वेल्डिंगची कामेही करतात. अंबरनाथमधील गुरुकुल शाळेत शिकणारा आशिष हा यंदा दहावीची परीक्षा देणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून आशिष प्रशिक्षक मनीष पाल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. ऑर्डनन्स फॅक्टरीच्या मैदानात सकाळी साडेचार ते साडेसात व सायंकाळी साडेचार ते साडेसहा असा सराव केला जातो. या ठिकाणी अनेक खेळाडू सरावासाठी येतात, मात्र त्यासाठी मनीष शुल्क घेत नाही.
यासंदर्भात मनीष यांना विचारले असता ते म्हणाले की, आशिष हा अत्यंत मेहनती व गुणी खेळाडू असून यापूर्वी राज्य व राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातही त्याने चांगली कामगिरी केली होती. मात्र राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आता आशिष आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी सज्ज असून तो नक्कीच त्यात यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.