Ambernath: शौचालयाची स्वच्छता होत नसल्याने शिवसेना युवा सेनेचे आंदोलन
By पंकज पाटील | Published: October 6, 2023 07:57 PM2023-10-06T19:57:04+5:302023-10-06T19:57:34+5:30
Ambernath News: अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील शौचालयांची स्वच्छता करण्याची कामे गेल्या काही महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील अनेक शौचालय वापरणे देखील शक्य होत नाही.
- पंकज पाटील
अंबरनाथ - अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील शौचालयांची स्वच्छता करण्याची कामे गेल्या काही महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील अनेक शौचालय वापरणे देखील शक्य होत नाही. या समस्येच्या अनुषंगाने आज शिवसेनेच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका कार्यालयात आंदोलन केले.
अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने शहरातील शौचालयांची स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र निविदा काढली होती. त्यानुसार शहरात कामे देखील सुरू होती. मात्र या निविदा प्रक्रियेमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढू लागल्याने पालिका प्रशासनाला शौचालय स्वच्छतेचे काम थांबवण्याची वेळ आली होती. शौचालय स्वच्छतेची नवीन निविदा मंजूर होत नाही तोपर्यंत जुन्याच ठेकेदाराला काम करणे क्रमप्राप्त असताना देखील पालिका प्रशासनाने जुन्या ठेकेदाराला काम करण्यासाठी अद्यापही मुदतवाढ दिलेली नाही. असे असतानाही संबंधित ठेकेदार शहरातील शौचालयांची स्वच्छता करीत आहे.मात्र पालिका प्रशासन या शौचालयाच्या स्वच्छतेबाबत योग्य धोरण अवलंबत नसल्यामुळे शहरातील सर्वच शौचालयांची अवस्था बिकट झाली आहे.
शौचालयांच्या या अवस्थेबाबत पालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी युवा सेना अधिकारी राहुल सोमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेत 'टमरेल' आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलन करताना पालिका अधिकाऱ्यांकडून कोणतेही ठोस उत्तर न मिळाल्याने त्यांचा संताप अनावर झाला होता. दरम्यान युवा सेनेने ज्या समस्येबाबत आंदोलन केले त्या समस्येचे मूळ हे पालिका प्रशासनाचे चुकीचे धोरण असल्याची बाब समोर आली आहे. शौचालय स्वच्छतेसाठी नवीन निविदा काढलेल्या असताना देखील पालिका प्रशासन एका मर्जीतल्या ठेकेदाराला काम देण्यासाठी ती निविदा उघडत नसल्याची बाब देखील पुढे येत आहे. त्यातच जुन्या ठेकेदाराला मुदतवाढ देत नसल्यामुळे शहरातील शौचालयांची दुरवस्था वाढत असल्याचे समोर आले आहे.