अंबरनाथ: शस्त्रनिर्मिती कारखान्यासाठी ब्रिटिशांनी उभारलेले स्टेशन, जाणून घ्या इतिहास...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 09:22 AM2022-06-13T09:22:38+5:302022-06-13T09:23:00+5:30
अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाल्याने या ठिकाणी देशभरातील कामगार रोजगारानिमित्त स्थिरावले आहेत.
पंकज पाटील
अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाल्याने या ठिकाणी देशभरातील कामगार रोजगारानिमित्त स्थिरावले आहेत. उद्योगांसाठी लागणारा सर्व कच्चा माल रेल्वेच्या मालगाडीतून अंबरनाथ स्थानकात येत असे. त्यामुळे अंबरनाथ रेल्वे स्थानक हे औद्योगिक विकासाचा मार्ग ठरले होते. आता या रेल्वेस्थानकात मालवाहतूक होत नसली, तरी लोकल प्रवाशांची संख्या वाढली आहे.
मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाचा प्रारंभ झाल्यानंतर रेल्वेचा कल्याण आणि अंबरनाथच्या दिशेने विस्तार झाला. अंबरनाथ शहरात अनेक मोठमोठे कारखाने असल्याने त्यांना कच्चा माल आणण्यासाठी येथे मालवाहतुकीचे स्वतंत्र स्टेशनही उभारले गेले होते. इतर मालवाहतुकीचे स्थानक आता बंद अवस्थेत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात अंबरनाथमध्ये ब्रिटिशांनी शस्त्रनिर्मितीचे कारखाने सुरू केले होते. या कारखान्यात कच्चा माल आणण्यासाठी आणि तयार झालेली शस्त्रे नेण्यासाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग टाकले होते. त्यासाठीही स्वतंत्र स्थानक तयार केले होते. मात्र, आता ते स्थानकही बंद अवस्थेत आहे.
रोज दीड लाख प्रवासी
- मालवाहतुकीसाठी तयार केलेले स्टेशन
- रोज दीड लाख प्रवाशांचा प्रवास
- वर्षभरापूर्वी अंबरनाथ रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्मची निर्मिती
- वाहन पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्याने रेल्वे स्थानकाच्या बाहेर अवैध पार्किंग
- रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात असून, प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.
- प्रवाशांच्या सोयीसाठी केवळ प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरच शौचालयाची सुविधा आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरही शौचालय गरजेचे आहे.
- रेल्वे स्थानकात नवीन रेल्वे पादचारी पूल झाला असता तरी स्वयंचलित जिन्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.
- ज्या ठिकाणी स्वयंचलित जिने बसविण्यात आले होते, तो पूल तोडण्यात आला आहे.