Ambernath: आरोपींना न्यायालयात आणताना पोलिसांनी पत्रकारांना दिला चकवा
By पंकज पाटील | Published: August 19, 2023 09:05 PM2023-08-19T21:05:52+5:302023-08-19T21:10:14+5:30
Crime News: नंदकुमार ननावरे यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर ज्या आरोपींना अटक करण्यात आली होती. त्या आरोपींना आज उल्हासनगरच्या न्यायालयात आणताना पोलिसांनी पत्रकारांना चकवा देण्याचा प्रयत्न केला.
- पंकज पाटील
अंबरनाथ - नंदकुमार ननावरे यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर ज्या आरोपींना अटक करण्यात आली होती. त्या आरोपींना आज उल्हासनगरच्या न्यायालयात आणताना पोलिसांनी पत्रकारांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. काही आरोपींना मुख्य प्रवेशद्वारासमोरून आणले तर काही आरोपींना थेट मागच्या प्रवेशद्वारातून न्यायालयात आणण्यात आले.
ननवरे यांच्या आत्महत्या प्रकरणातील काही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार होते. पत्रकार देखील मुख्य प्रवेशद्वारा जवळ या आरोपींच्या चित्रीकरणासाठी थांबले होते. मात्र पोलिसांना याची कल्पना लागताच काही आरोपींना न्यायालयाच्या मागच्या प्रवेशद्वारातून कोर्टात आणण्यात आले, तर काही आरोपी मुख्य प्रवेशद्वारासमोरूनच आले. न्यायालयात आरोपीचे वकील यांनी युक्तिवाद करताना ननावरे दांपत्याच्या सुसाईड नोटमध्ये संबंधित आरोपींकडे चौकशी करा असा उल्लेख असल्यामुळे यांना थेट आरोपी करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले तर दुसरीकडे पोलिसांनी आरोपींकडे चौकशीसाठी 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींच्या वतीने एडवोकेट अर्जुन जयस्वानी यांनी बाजू मांडली.
'' शशिकांत साठे हे माझे स्वीय सहाय्यक आहे ही बाब जग जाहीर आहे. विधिमंडळातील माझें कामकाज देखील तेच पाहत असतात. मात्र साठे आणि ननावरे यांचे व्यक्तिगत संबंध काय होते आणि कसे होते याबाबत आपल्याला कल्पना नाही. मात्र सुसाईड नोटमध्ये जी नावे टाकण्यात आली होती त्यांच्याकडे चौकशी करावी अशी मागणी ननावरे यांनी केली होती. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात योग्य ती चौकशी करावी अशी आपली अपेक्षा आहे.
- डॉक्टर बालाजी किणीकर
(आमदार अंबरनाथ)