अंबरनाथचा आयुध निर्माण कारखानाच असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 03:24 AM2017-12-26T03:24:31+5:302017-12-26T03:24:36+5:30

संरक्षण दलाशी संबंधित परिसरात तुम्हाला साधी पिनही घेऊन जाता येत नाही, इतकी कडक सुरक्षा व्यवस्था असते.

Ambernath's armament manufacturing factory is unsafe | अंबरनाथचा आयुध निर्माण कारखानाच असुरक्षित

अंबरनाथचा आयुध निर्माण कारखानाच असुरक्षित

Next

- पंकज पाटील

संरक्षण दलाशी संबंधित परिसरात तुम्हाला साधी पिनही घेऊन जाता येत नाही, इतकी कडक सुरक्षा व्यवस्था असते. तुम्ही तेथे गेलात, तर तुमची सखोल चौकशी केली जाते. खातरजमा केल्यानंतरच तुम्हाला प्रवेश दिला जातो. मात्र, अंबरनाथमधील आयुध निर्माण कारखान्याच्या वसाहतीत काही वर्षांपासून सुरक्षिततेकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने आवारातच बेकायदा वस्ती वाढून गुन्हेगारांचा वावर वाढला आहे. हे सगळे माहीत असूनही त्यावर कुणीही कारवाई करत नाही, हेच मोठे आश्चर्य आहे.
अंबरनाथ शहराची ओळख ही प्राचीन शिव मंदिर आणि भारतीय संरक्षण विभागाला शस्त्रपुरवठा करणाºया आयुध निर्माण कारखान्यामुळे मिळाली आहे. अंबरनाथ शहरात आयुध (शस्त्रनिर्मिती) करणारा कारखाना असल्याने या शहराच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्यात येते. पोलीस दलासोबत आयुध निर्माण कारखान्याची स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी आहे. मात्र, असे असतानाही संरक्षण विभागाची मोक्याची जागा ही अंबरनाथच्या भूमाफियांनी हडपली आहे. एवढेच नव्हे तर संरक्षण विभागाच्या या जागेवर बेकायदा वस्ती उभारत तेथे बांधण्यात येणारी घरे चक्क गुन्हेगारांना विकली जातात, हे वास्तव आहे. भूमाफियांच्या या कारवायांची माहिती अंबरनाथ आयुध निर्माण कारखान्याला असतानाही त्यांनी आपल्या जागेचे संरक्षण करण्यासाठी कोणतीच ठोस कार्यवाही केलेली नाही. आयुध निर्माण कारखाना या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करत असल्याने या ठिकाणी उभारलेल्या वस्तीमुळे कारखान्याच्या सुरक्षेलाच धोका निर्माण झाला आहे.
दुसºया महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सरकारच्या वेळी अंबरनाथमध्ये आयुध निर्माण कारखाना उभारण्यात आला. देशाच्या संरक्षण विभागातील तिन्ही दलांना शस्त्रनिर्मितीसाठी लागणारे साहित्य तयार करण्यासोबत सर्व प्रकारच्या रायफलींमधील बुलेट बनवण्याचे काम या कारखान्यात केले जाते. तसेच रिव्हॉल्व्हरही याच कारखान्यात बनवल्या जातात. रणगाड्यांच्या अनेक साहित्यांची निर्मिती आयुध निर्माण कारखान्यातील एमटीपीएफ कारखान्यात केली जाते. आॅर्डनन्स फॅक्टरी अंबरनाथ आणि मशीन अ‍ॅण्ड टूल प्रोटोटाइप फॅक्टरी असे दोन मोठे कारखाने एकाच वसाहतीत आहेत. बोफर्ससारख्या तोफांसाठी लागणारे साहित्यदेखील याच कारखान्यात तयार होत असल्याने या कारखान्याच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात येते. या कंपनीला धोका निर्माण होऊ नये, यासाठी कंपनीच्या वसाहतीपासून १०० मीटर अंतरावर इमारतींच्या बांधकामांनाही परवानगी नाकारण्यात येते. तसेच पेट्रोलपंप यांच्यासह ज्वलनशील कारखाने उभारण्यासही बंदी आहे. कंपनीच्या स्थापनेपासूनच सुरक्षेकडे विशेष लक्ष देणाºया कंपनी व्यवस्थापनाचे आता सुरक्षेकडे काहीसे दुर्लक्ष होत आहे. व्यवस्थापन आता कारखान्यातील उत्पादन आणि त्यांची कार्यप्रणाली यावरच लक्ष देत आहे. कंपनीच्या परिसरात घडणाºया घटना आणि सुरक्षेला बाधा निर्माण करणाºया कारवायांकडे पूर्णत: दुर्लक्ष करत आहे. कंपनीतील कामगारांसाठी असलेली वसाहत ओस पडल्याने कंपनीने ही वसाहत जमीनदोस्त करून जागा सपाट केली आहे. त्यामुळे कंपनी परिसरात नागरिकांचा वावर कमी झाला आहे. मात्र, त्याचाच लाभ आता परिसरातील चोरटे आणि गुन्हेगार घेत आहेत. त्यामुळे कंपनीत राहणाºया नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.
अंबरनाथ आयुध निर्माण वसाहतीच्या चारही बाजूंना बेकायदा वस्तीचा वेढा वाढला आहे. त्यातही या चारही वस्त्या गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध आहेत. कंपनीच्या एका दिशेला वांद्रापाडा आणि भाटवाडीसारखा परिसर आहे. या ठिकाणी चोरट्यांची मोठी वसाहतच आहे. सोबत, बेकायदा काम करणाºयांची मोठी टोळी वसलेली आहे. एवढेच नव्हे तर अमली पदार्थांची विक्री करण्याचा मोठा व्यवसाय या ठिकाणी सुरू असतो. गांजासारखा अमली पदार्थ या ठिकाणी सहज उपलब्ध होतो. असे असतानादेखील या वस्तीवर कोणतीच कार्यवाही केली जात नाही, हे मोठे आश्चर्य आहे. तर, कंपनीच्या दुसºया बाजूला उल्हासनगरचा भाग आहे. उल्हासनगरमधील वस्तीमध्येही गुन्हेगारांचाच वावर मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या ठिकाणापासून कंपनी काही अंतरावरच आहे. कंपनीच्या महाव्यवस्थापकांच्या बंगल्यासोबत इतर अधिकाºयांचेही बंगले याच वस्तीला लागून आहेत. या वस्तीतील नागरिकांचा सतत वावर कंपनीच्या वसाहतीत सुरू असतो. याची कल्पना कंपनीला असतानादेखील त्याचा अद्याप कोणताच बंदोबस्त करण्यात आलेला नाही. कंपनीच्या तिसºया टोकाला साईबाबा मंदिर परिसरातील सम्राट अशोकनगर भागातही गुन्हेगारांचाच वावर मोठ्या प्रमाणात आहे. कंपनीच्या तिन्ही बाजूंना असलेली वस्ती ही सरकारी जागेत असल्याने त्यावर थेट कारवाई आयुध निर्माण कारखान्याच्या वतीने करता येत नाही. मात्र, संरक्षणाला बाधा निर्माण होत असेल, तर त्यासंदर्भातील तक्रार जिल्हाधिकारी यांना दिल्यास जिल्हाधिकारी पालिकेमार्फत कारवाई सहज करू शकतात. असे असतानाही कंपनीने कोणताच पत्रव्यवहार केलेला नाही.
कंपनीच्या तिन्ही बाजूंना असलेला धोका कमी होता म्हणून की काय, आता कंपनीच्या स्वत:च्या जागेवरच भूमाफियांनी बेकायदा वस्ती वसवण्यास सुरुवात केली आहे. आयुध निर्माण कारखान्याची जागा असल्याने पालिका प्रशासनही आपल्या सोयीने या वस्तीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. अंबरनाथ आयुध निर्माण कारखान्याच्या स्टेशनकडे जाणाºया प्रवेशद्वाराजवळच ही वस्ती वसवण्यात आलेली आहे. अवघ्या दीड ते दोन वर्षांत या ठिकाणी मोठी वस्ती निर्माण झाली आहे. ज्या कंपनीच्या नागरी वसाहतीत साधा फोटो काढण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, त्या वसाहतीला लागून मोठी वसाहत वसवली जात आहे.
>वसाहतीच्या
सुरक्षेकडे दुर्लक्ष
अंबरनाथ आयुध निर्माण वसाहतीमधील ७० टक्के कामगार हे वसाहतीत न राहता शहरात इतरत्र राहतात. वसाहतीच्या सुरक्षेकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देणे शक्य आहे. मात्र, असे असतानाही कंपनी अंतर्गत सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहे. वसाहतीत येणाºयांची कोणतीच चौकशी केली जात नाही. संशयास्पद व्यक्तीला थांबवण्याचे कामदेखील सुरक्षारक्षकांमार्फत केले जात नाही. कंपनीची सुरक्षा झाली म्हणजे आपली जबाबदारी पार पडली, अशी समजूत झाली आहे.
वाहनांची चौकशी न करताच प्रवेश
अंबरनाथ आयुध निर्माण वसाहतीत प्रवेश करणाºया प्रत्येक गाडीची तपासणी करूनच त्या गाडीला वसाहतीत प्रवेश दिला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांत एकाही वाहनाची चौकशी किंवा तपासणी केली जात नाही. सुरक्षारक्षक हे केवळ आपल्या केबिनमध्ये बसून राहतात. कोण आले, कोण गेले, याची कोणतीच नोंद घेतली जात नाही. त्यामुळे आयुध निर्माण वसाहत म्हणजे ‘आव-जाव घर तुम्हारा’ अशी झाली आहे.

Web Title: Ambernath's armament manufacturing factory is unsafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.