अंबरनाथच्या डेंटल कॉलेजला दातखिळी
By admin | Published: February 24, 2017 06:59 AM2017-02-24T06:59:13+5:302017-02-24T06:59:13+5:30
मागील तीन ते चार वर्षांपासून वादात सापडलेल्या अंबरनाथमधील गार्डियन डेंटल कॉलेजला आता कायमची
अंबरनाथ : मागील तीन ते चार वर्षांपासून वादात सापडलेल्या अंबरनाथमधील गार्डियन डेंटल कॉलेजला आता कायमची दातखिळी बसली आहे. या महाविद्यालयातील २०१६-१७ या वर्षातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला केंद्र सरकारच्या आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाने मान्यता नाकारली आहे. तसेच हे महाविद्यालय बंद करण्याचे आदेश केंद्राने राज्य सरकारला दिले आहेत.
अंबरनाथमधील जांभूळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गार्डियन महाविद्यालय उभारले होते. मात्र, सुरुवातीपासूनच हे महाविद्यालय प्रवेशावरून आणि नंतर बेकायदा इमारतीवरून वादात सापडली. बनावट कागदपत्रे तयार करून हे महाविद्यालय उभारण्यात आले होते. याप्रकरणी सरकारच्या विविध स्तरांवर त्याच्या तक्रारीही करण्यात आल्या होत्या. त्यामुळेच २०१०-११ आणि २०११-१२ या वर्षाच्या बीडीएस अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी केंद्र सरकारने परवानगी नाकारली. त्यामुळे प्रवेश घेतलेल्या ५५ विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली होती. अखेर, या विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या दंत महाविद्यालयामध्ये स्थलांतरित करण्यात आले. तसेच याप्रकरणी महाविद्यालयाला प्रत्येक विद्यार्थ्यामागे १ लाखांचा दंडही भरण्याचे आदेश दिले होते. मात्र, दंडाचा रक्कम असलेला धनादेश न वठल्याने पुन्हा हे महाविद्यालय चर्चेत आले. हे कमी होते की काय, या महाविद्यालयाची पालिकेने बांधकाम परवानगीही रद्द केली.
यासोबतच जमीनमालकाच्या नावे खोटी कागदपत्रे तयार करून त्या आधारावर बांधकाम परवानगी घेतल्याचे उघड झाल्याने याप्रकरणीही महाविद्यालयाच्या प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल झाला होता. वाद असतानाही महाविद्यालय प्रशासन उघडपणे महाविद्यालय सुरूच ठेवून विद्यार्थ्यांची फसवणूक करीत होते. याप्रकरणी नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे यांनी सरकारकडे तक्रार करून हे महाविद्यालय कायमचे बंद करण्याची मागणी केली होती. (प्रतिनिधी)