अंबरनाथचा तावली डोंगर खचतोय..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 12:51 AM2020-08-11T00:51:01+5:302020-08-11T00:51:05+5:30
डोंबिवलीपासून बदलापूरपर्यंतच्या भागातून हा तीन टोकांचा तावलीचा डोंगर दिसतो. मलंगगडाच्या डोंगररांगेतील हा उंच डोंगर असून त्या डोंगराला सध्या तडा गेला आहे.
अंबरनाथ : तालुक्यातला तीन टोकांचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असलेला तावलीचा डोंगर खचायला सुरुवात झाली आहे. या डोंगराचे एक टोक ढासळले असून यामुळे मोठ्या प्रमाणात दगड-धोंडे, मोठमोठे खडक खाली आले आहेत. डोंबिवलीपासून बदलापूरपर्यंतच्या भागातून हा तीन टोकांचा तावलीचा डोंगर दिसतो. मलंगगडाच्या डोंगररांगेतील हा उंच डोंगर असून त्या डोंगराला सध्या तडा गेला आहे. या तीन टोकांपैकी मधल्या टोकावर काही दिवसांपूर्वी वीज कोसळली. तेव्हापासून हा भाग खचायला सुरुवात झाली. सध्या या डोंगराचा लक्षणीय भाग ढासळला असून मधल्या भागात एक मोठा पट्टा तयार झाला आहे. या भागातून मोठ्या प्रमाणात दगड, धोंडे, मोठे खडक सातत्याने खाली येत आहेत. या डोंगरातून उगम पावणारा ओढा हा अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाचा प्रमुख जलस्रोत आहे. मात्र, सध्या हा ओढाही बुजण्याच्या मार्गावर आहे. शिवाय, हेच दगड-धोंडे चिखलोली धरणाच्या पात्रात जात असल्याने चिखलोली धरणाच्या भिंतीवर दाब वाढण्याचीही भीती व्यक्त होत आहे. महसूल विभाग, वनविभाग, लघुपाटबंधारे विभागाने अद्याप याकडे लक्ष दिलेले नाही.
अंबरनाथमधील निसर्गमित्र सुधाकर झोरे हे यासाठी पाठपुरावा करत आहेत. शिवाय, स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांनीही याबाबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अजून तरी शासकीय यंत्रणेला जाग आलेली नाही.