ठाण्यातील रुग्णवाहिका चालकांना भेडसावताहेत अनेक समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 08:18 PM2020-03-29T20:18:49+5:302020-03-29T20:23:41+5:30
कोरोनाला घाबरु नका असे वारंवार राज्य सरकारकडून सांगितले जात आहे. तशा जाहिरातीही प्रसारित केल्या आहेत. मात्र,सर्वसामान्यांमध्ये त्याची चांगलीच दहशत आहे. त्याचाच फटका आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांप्रमाणे रुग्णवाहिका चालक आणि डॉक्टरांनाही बसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाच्या विषाणूंची भीती सर्वसामान्यांमध्ये वाढलेली आहे. त्याचा फटका आरोग्य क्षेत्रात काम करणाºया अनेक यंत्रणांना बसतो आहे. विशेषत: रुग्णवाहिका चालक आणि डॉक्टरांनाही वाईट अनुभव येत आहेत. काही गृहसंकुलांमध्ये रुग्णांना घेण्यासाठी गेलेल्या रुग्णवाहिकांनाही प्रवेशासाठी मज्जाव केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोना आजार हा संसर्गजन्य असल्यामुळे आरोग्य यंत्रणेतील प्रत्येक घटकाकडे संशयाने पाहिले जात असल्याचा अनुभव या क्षेत्रातील अनेकांना येत आहे. त्यातच कोरोना सोडून इतर रु ग्णाला घेण्यासाठी रु ग्णवाहिका गेली तरी त्यांनाही थेट गृहसंकुलात प्रवेश करण्यास प्रतिबंध केले जात आहेत. काही रुग्णवाहिका रुग्णालयीन काम आटोपल्यानंतर इतर ठिकाणी उभ्या केल्या जातात. पण आता आपल्या इमारतीखाली रु ग्णवाहिका उभी करण्यासाठीही रहिवाशांकडून आक्षेप घेतले जात आहेत. त्यामुळे अनेक चालकांना त्यांच्या
रु ग्णवाहिका रुग्णालयाच्या आवारात किंवा त्या परिसरातच उभ्या करुन पायीच आपले घर गाठावे लागत आहे. अशावेळी विरोध करणाऱ्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रारही केली जाऊ शकते. या सर्व प्रक्रीयेमध्ये बराच वेळ खर्ची होत असल्यामुळे बहुतांश चालकांनी वादविवाद टाळून काही सुवर्णमध्य साधता येतो का? त्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मुंब्रा भागात तर काही रु ग्णवाहिकांना थेट परतीचा रस्ता तेथील नागरिकांनी दाखविल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या एखाद्या निगेटिव्ह रु ग्णाला पुन्हा सोसायाटीत सोडण्याची वेळ आली तर आरोग्य सेवकांबरोबर हमरीतुमरीचेही प्रकार होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाण्यातील काही नामांकित डॉक्टरांनाही असेच अनुभव येत असल्याची माहिती बालरोग तज्ज्ञ डॉ. संतोष कदम यांनी दिली.
‘‘ सध्याच्या वातावरणात खासगी रुग्णवाहिकांना संरक्षण देण्याची गरज आहे. ठाण्यातील एका विभागातून दुसºया विभागात रुग्णांना घेऊन गेल्यानंतर परत त्याच विभागात येण्यास रुग्णवाहिका चालकांना नाहक मज्जाव केला जात आहे. खासगी रुग्णवाहिका चालक रुग्णांना सेवा देत असतात. परंतु त्यांच्याकडे कोरोनाचा रुग्ण हाताळण्यासाठी उच्च प्रतीची सामुग्रीही नाही. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. विनाकारण आमच्या कामगारांना मारहाण देखील होत आहे. ही गंभीर बाब आहे.’’
जीवन विश्वकर्मा, जीवन रुग्णवाहिका, ठाणे
‘‘ अनेक ठिकाणी स्वयंपाक किंवा इतर काम करणाºया महिलांना सोसायटयांमध्ये तूर्त बंदी आहे. तसाच डॉक्टरांमुळेही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अशीही नाहक भीती अनेकांना आहे. पण ही भीती निरर्थक आहे. डॉक्टर हे रुग्णांच्या सेवेसाठीच काम करतात. त्यांच्याकडेही अशा प्रकारे संशयाने पाहणे, त्यांना वेगळी वागणूक देणे योग्य नाही. पण नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळले तर कोरोनाला लांब ठेवण्यात नक्कीच यश येईल.’’
डॉ. संतोष कदम, बालरोग तज्ज्ञ, ठाणे