भिवंडीतील वाहतूक कोंडीत अडकली रुग्णवाहिका; मनपाच्या सुशोभीकरणाचा प्रवाशांना फटका
By नितीन पंडित | Published: April 27, 2023 04:23 PM2023-04-27T16:23:10+5:302023-04-27T16:24:13+5:30
या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यात वाहतूक विभागाला पुरता अपयश आलेले आहे.
भिवंडी: शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट बनली असून महापालिकेच्या मुख्यालयासमोरच प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यात वाहतूक विभागाला पुरता अपयश आलेले आहे.
महापालिका मुख्यालयाच्या समोर असलेल्या शांतीनगर गैबी नगर रस्त्याच्या समोर उड्डाणपुलाखाली करण्यात येत असलेल्या सुशोभिकरणामुळे उड्डाणपुलाखालील रस्ता बंद करण्यात आला आहे.त्यामुळे शांतीनगरकडे जाणारी वाहने जकातनाका येथून विरुद्ध दिशेने येत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.
कोट्यावधी रुपये खर्च करून एम एम आर डी ए च्या माध्यमातून शांतीनगर, गैबी नगर रस्ता रुंदीकरणासह काँक्रेटीकरण करण्यात येत आहे. मात्र कोट्यावधी रुपये खर्चूनही सुशोभीकरणच्या नावाने उड्डाणपुलाखालील रस्ता बंद असल्याने वाहन चालकांना शांतीनगरकडे जातांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत असते.
गुरुवारी दुपारी या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून पडली होती.त्यामुळे ही वाहतूक कोंडी नागरिकांच्या जीवावरच उठली असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. केवळ सुशोभीकरणाचे नाव पुढे करत महानगरपालिका प्रशासन या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. महापालिका प्रशासनाच्या या आडमुठी धोरणाचा फटका शहरातील वाहतूक पोलिसांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे.