रुग्णसंख्या घटल्याने अॅम्ब्युलन्सही निम्म्यावर; टीएमटी बस केल्या होत्या परावर्तीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:45 AM2020-08-29T00:45:50+5:302020-08-29T00:46:27+5:30
अजित मांडके ठाणे : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ठाण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे शहरातील कोविड रुग्णालयातील सुमारे १२०० ...
अजित मांडके
ठाणे : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ठाण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे शहरातील कोविड रुग्णालयातील सुमारे १२०० बेड शिल्लक आहेत. साहजिकच, आता महापालिकेकडे असलेल्या अॅम्ब्युलन्सची संख्याही कमी झाली आहे. ही संख्या ८० वरून ४० वर आली आहे.
गेल्या काही महिन्यात शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अॅम्ब्युलन्सची कमतरता जाणवत होती. परंतु गेल्या काही दिवसात रुग्ण कमी झाल्याने अॅम्ब्युलन्स पुरेशा ठरत असून रुग्णांना आता वेळेत अॅम्ब्युलन्स उपलब्ध होत आहेत. सुुरुवातीला काही ठिकाणी अॅम्ब्युलन्स पोहोचण्यास पाच ते सहा तासांचा कालावधी लागत होता. परिणामी, दोन ते तीन रुग्णांचे मृत्यूदेखील झाले. खाजगी रुग्णालयांच्या अॅम्ब्युलन्स किंवा खाजगी अॅम्ब्युलन्स यांनी रुग्णांची लूट केली. जवळच्या अंतरासाठीदेखील ८ ते १० हजार रुपये आकारले जात होते. अॅम्ब्युलन्स अनुपलब्धतेचा विषय गाजल्याने टीएमटी बसचे अॅम्ब्युलन्समध्ये रूपांतर केले. त्यामुळे महापालिकेकडे ८० रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या. त्यानंतर, रुग्णांसाठी अॅम्ब्युलन्स वेळेत उपलब्ध होऊ लागल्या. रुग्णांचे होणारे हाल थांबले.
आता ठाण्यात रुग्णांची संख्या कमी झाली, त्यामुळे महापालिकेने आपल्या सेवेतील ४० अॅम्ब्युलन्स कमी केल्या. यामध्ये मुख्यत्वे टीएमटीच्या बसगाड्या ज्या अॅम्ब्युलन्समध्ये परावर्तीत केल्या होत्या, त्या कमी करण्यात आल्या आहेत. यामध्ये महापालिकेच्या चार, खाजगी संस्थेच्या सहा आणि कार्डिअॅक १० व आॅक्सिजन रुग्णवाहिकांचा समावेश आहे. तर, हॉस्पिटलमधून घरी सोडण्यासाठी सध्या रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. दिवसाला ५० च्या आसपास फेऱ्या होत आहेत. रुग्णांची संख्या कमी झाल्याने अॅम्ब्युलन्स पडून होत्या. त्यामुळे त्यांची संख्या कमी केली आहे.
अॅम्ब्युलन्स कमी; रूग्णांची होत होती लूट
शहरातील वाढती रूग्णसंख्या पाहता अॅम्ब्युलन्सही अपुºया पडत होत्या. त्याचा फटका काही रूग्णांना बसला. त्यामुळे महापालिकेने टीएमटी बसचे अॅम्ब्युलन्समध्ये रूपांतर केले होते.
आता रुग्णांना वेळेवर अॅम्ब्युलन्स मिळत असल्याने तक्रारी शून्यावर आल्या आहेत. रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णवाहिकांची संख्या कमी करण्यात आली आहे. मात्र, गरज पडल्यास तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येतील. - केदार पाटील, रुग्णवाहिका प्रमुख, ठाणे महापालिका