‘घाणेकर’च्या सिलिंगची विनानिविदा दुरुस्ती; युद्धपातळीवर काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 01:26 AM2019-07-23T01:26:14+5:302019-07-23T01:26:37+5:30
भरत जाधव यांच्या व्हिडीओने अब्रू चव्हाट्यावर
ठाणे : डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील वातानूकुलीत यंत्रणा बंद असल्याचा अभिनेता भरत जाधव यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा ठाणे महापालिकेचे धिंडवडे निघाले आहेत. वास्तविक, घाणेकर नाट्यगृहातील स्टेजवरील सिलिंगचा काही भाग जून महिन्यात पडला होता. एक महिन्यानंतर त्याची आता तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मात्र, एक महिन्यानंतर काम करताना त्याची निविदा काढलेली नसून त्याची मंजुरी ५-२-२ खाली घेण्यात येणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. तसेच ज्या वेळेस जाधव यांचा प्रयोग चालू होता, त्यावेळेस एसी सुरू होते. परंतु, सिलिंगच्या दुरुस्तीसाठी वरील भाग पूर्ण उघडल्याने त्यामुळेच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, गेले एक ते दीड वर्षे दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवलेल्या नाट्यगृहात मग कशाची दुरुस्ती केली असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
शनिवारी भरत जाधव यांच्या नाटकाचा प्रयोग घाणेकर नाट्यगृहात सुरू होता. परंतु, घामाच्या धारांनी हैराण झाल्याने त्यांनी सोशल मिडियावर याची व्यथा मांडल्याने ती वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पालिकेचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले आहेत. त्यानंतर रविवारी सभागृह नेते नरेश म्हस्के आणि सोमवारी आमदार संजय केळकर यांनी या नाट्यगृहाची पाहणी करून दुरुस्ती युद्धपातळीवर करण्याच्या सूचना पालिकेच्या संबधींत विभागाला दिल्या.
असे असले तरी ज्या दिवशी जाधव यांचा प्रयोग चालू होता, त्यादिवशी एसी सुरू असल्याची बाब समोर आली आहे. परंतु, स्टेजवरील सिलिंगचा काही भाग पडल्याने त्या ठिकाणी दुरुस्तीसाठी अख्खे भगदाड पाडण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून एसी सुरू असतांनाही स्टेजवर किंवा आजूबाजूच्या भागात कुलिंग झालेच नसल्याची बाब समोर आली आहे. परंतु, ही बाब पालिकेचा सार्वजनिक विभाग मान्य करण्यास तयार नसून त्यांनी याचे खापर इलेक्ट्रिकल विभागावर फोडले आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या मुद्यावरून किंवा होणाºया टिकेपासून वाचण्यासाठी आता या दोन विभागांमध्येच चांगलीच जुंपली आहे. प्रत्यक्षात पाहणी केली असता स्टेजवरील सिलिंगला मोठे भगडाद पडल्याचे स्पष्ट दिसत आहे.
मंगळवारपर्यंत होणार दुरूस्ती
नाट्यगृहाची दुरुस्ती ही अत्यावश्यक बाब असल्याने घटना जून महिन्यात घडली असतांनाही या ठिकाणी विविध नाट्यप्रयोग आणि इतर कार्यक्रम सुरू असल्याने दुरुस्ती करता आली नव्हती.
परंतु,या कालावधीत पालिकेच्या संबधींत विभागाकडून निविदा काढणे शक्य होते किंवा त्याची प्रक्रिया सुरू करणे शक्य होते. परंतु, आता जाधव यांच्या व्हिडीओने टीका झाल्यानंतर तातडीची बाब म्हणून संपूर्ण सिलिंगच्याच दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून मंगळवारी ते पूर्ण होईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
या कामाचा खर्च ५ -२-२ खाली तातडीची बाब म्हणून नंतर मंजूर केला जाईल, असेही आता पालिकेने स्पष्ट केले आहे.