अमेरिकेच्या कलावंतांचा नृत्याविष्कार रंगणार
By admin | Published: February 16, 2017 01:54 AM2017-02-16T01:54:44+5:302017-02-16T01:54:44+5:30
शिवभक्त प्रतिष्ठान आणि शिवसेना शहर शाखा यांच्या वतीने १७ ते २१ फेब्रुवारीदरम्यान बदलापूर पश्चिमेकडील उल्हास नदी चौपाटीवर
बदलापूर : शिवभक्त प्रतिष्ठान आणि शिवसेना शहर शाखा यांच्या वतीने १७ ते २१ फेब्रुवारीदरम्यान बदलापूर पश्चिमेकडील उल्हास नदी चौपाटीवर बदलापूर महोत्सव होणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात बदलापूरकरांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे. या महोत्सवात यंदा अमेरिकेतील नृत्याविष्कार सादर होणार आहे. भारतीय आणि पाश्चात्त्य नृत्यांची जुगलबंदी या महोत्सवाचे आकर्षण ठरणार असल्याचे नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी सांगितले.
चार वर्षांपासून बदलापूर महोत्सव भरवण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात विविध जाती आणि धार्मिक महोत्सव होत असताना हा महोत्सव जात आणि धर्मांच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने संस्कृतीचे जतन करणारा आणि कलागुणांना वाव देणारा महोत्सव ठरणार आहे. शुक्रवारी शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्कप्रमुख प्रकाश पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. त्यानंतर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित स्वरमय जीवनप्रवास आणि माहितीपट सादर करण्यात येणार आहे.
१८ फेब्रुवारीला सायली पराडकर यांच्या लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. १९ फेब्रुवारीला ‘मला लगीन करायचंय’ हे विनोदी नाटक सादर होईल. तर, २० फेब्रुवारीला भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध राज्यांतील लोककला सादर केल्या जाणार आहेत. तसेच, याच दिवशी अमेरिकेहून काही कलाकार येणार असून ते नृत्य सादर करणार आहेत. समारोपप्रसंगी एव्हरग्रीन सचिन शो होणार आहे. या शो च्या माध्यमातून सत्तरहून अधिक कलाकारांचा अभिनय पाहण्याची संधी बदलापूरकरांना मिळणार आहे. महोत्सवाच्या ठिकाणी लेझर शो आणि संगीत कारंजेही उभारण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)