अमेरिकन कंपनी करणार तलाव, खाडीचे पाणी शुद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 02:54 AM2018-07-21T02:54:18+5:302018-07-21T02:54:22+5:30
शहरात अस्तित्वात असलेले तलाव, नाले तसेच खाडीचे पाणी शुद्धीकरणासाठी अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.
ठाणे : शहरात अस्तित्वात असलेले तलाव, नाले तसेच खाडीचे पाणी शुद्धीकरणासाठी अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. शुक्रवारी याबाबत आपल्या दालनात अमेरिकास्थित आॅइल स्पील फॅटर इंटरनॅशनल कॉर्पोरेशनचे चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्हन पेडिगो यांनी सादरीकरण करून जैव तंत्रज्ञानाचा वापर करून कशा पद्धतीने पाणी शुद्धीकरण केले जाते, याची माहिती दिली.
ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहराला ३५ तलावांची नैसर्गिक देणगी लाभली आहे. त्याचप्रमाणे ३२ किमी लांबीची विस्तीर्ण खाडी लाभली आहे. यातील पाणी उच्च प्रतीचे जैविक तंत्रज्ञान वापरून शुद्धीकरण करण्याबाबत आॅइल स्पील फॅटर इंटरनॅशनल कॉर्पोरेशनने सादरीकरण केले.
>गंगेचेही पाणी
करतेय स्वच्छ
सदरची कंपनी केंद्र सरकारच्या गंगा नदी शुद्धीकरण तसेच वाराणसी येथील राजघाट पाणी शुद्धीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी करत असून तशाच प्रकारचे तंत्रज्ञान खाडीतील पाणी शुद्धीकरण तसेच तलावातील पाणी शुद्धीकरण करण्यासाठी वापरण्याबाबतचा निर्णय आयुक्तांनी घेतला. त्यानुसार, याबाबत आॅइल स्पील फॅटर इंटरनॅशनल कॉर्पोरेशनने प्रस्ताव सादर करावा. त्यानंतर, याबाबत निर्णय घेऊन प्रायोगिक तत्त्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा विचार केला जाईल, असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.