शॅगीच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेचे प्रयत्न
By admin | Published: June 24, 2017 04:21 AM2017-06-24T04:21:52+5:302017-06-24T04:21:52+5:30
ठाण्यातील बोगस कॉल सेंटर प्रकरणातील सूत्रधार सागर उर्फ शॅगी ठक्कर याच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेने प्रयत्न सुरू केले आहेत.
राजू ओढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील बोगस कॉल सेंटर प्रकरणातील सूत्रधार सागर उर्फ शॅगी ठक्कर याच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी पत्रव्यवहार सुरू असला तरी, या प्रकरणी तपासही अद्याप सुरू असल्याने ठाणे पोलिसांनी प्रत्यार्पणासाठी हिरवा झेंडा दाखवला नाही.
कर थकित असलेल्या अमेरिकन नागरिकांना कारवाईची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या मीरा रोडमधील बोगस कॉल सेंटर्सचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी आॅक्टोबर २0१६ मध्ये केला होता. मुख्य सूत्रधार सागर ठक्कर याला एप्रिल २0१७ मध्ये अटक करण्यात आली. या प्रकरणातील पीडित नागरिक अमेरिकेचे असून, काही पीडित नागरिकांच्या तक्रारीवरून अमेरिकेतही खटला सुरू आहे. या तक्रारींच्या आधारे कॉल सेंटर प्रकरणातील आरोपींच्या अमेरिकेतील हस्तकांना मध्यंतरी अमेरिकन पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी अमेरिकन यंत्रणेने केलेल्या तपासामध्येही सागर ठक्करचे नाव समोर आले. त्यामुळे अमेरिकेने सागर ठक्करच्या प्रत्यार्पणासाठी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला. टप्प्याटप्प्याने हा पत्रव्यवहार पोलिसांपर्यंत पोहोचला असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.