महाराष्ट्र अन् अयोध्येचे आत्मीयतेचे नाते- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 08:52 AM2024-01-22T08:52:08+5:302024-01-22T08:52:16+5:30
राम मंदिरासाठी चंद्रपूर येथून पाठविले लाकूड
ठाणे : आता संपूर्ण देशात सर्वत्र राममय वातावरण तयार झाले आहे. आज प्रत्येक घरात राम असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री ठाण्यात केले. महाराष्ट्र आणि अयोध्येचे आत्मीयतेचे नाते आहे. राम मंदिराच्या उभारणीकरिता लागलेले लाकूड हे चंद्रपूर येथून पाठविले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ठाण्यातील उपवन तलाव येथे रविवारी रात्री आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने महाआरतीचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते महाआरती झाली. त्यानंतर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. या महाआरतीकरिता जबलपूर येथून ११ ब्राह्मण आले होते. आज राज्यात सगळीकडे रामनामाचा जयघोष सुरू आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत ऐतिहासिक राममंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. अयोध्येत राममंदिर उभारले जाणार हे स्वप्नवत वाटत होते. पण करोडो रामभक्तांचे स्वप्न सोमवारी साकार होत आहे.
ठाणे-कारसेवकांचे जिव्हाळ्याचे नाते
ठाणे आणि कारसेवकांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. दिवंगत आनंद दिघे यांनी मंदिराच्या उभारणीकरिता चांदीची वीट पाठवली होती, अशी आठवण यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितली. महाराष्ट्र आणि अयोध्येत आत्मीयतेचे, श्रद्धा आणि भक्तीचे नाते आहे. म्हणूनच एकटा जाण्यापेक्षा मी सोमवारी मंत्रिमंडळातील सदस्य खासदार, आमदार आणि येथील नागरिकांना घेऊन अयोध्येला जाणार आहे. आज राज्यात सगळीकडे मंदिराच्या उभारणीनिमित्त महाआरती आणि शोभायात्रा निघत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. काही व्यक्तींनी रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ते चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.