भाजपच्या इच्छुकांमध्ये ओमी पप्पू कलानीही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:29 AM2019-08-30T00:29:23+5:302019-08-30T00:29:27+5:30
उल्हासनगर विधानसभा : आयलानी, इदनानी यांनीही दिल्या मुलाखती
सदानंद नाईक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : उल्हासनगर विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रदेश सचिव विक्रांत देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पडल्या. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी, वादग्रस्त पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी, साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांच्यासह आठ जणांनी मुलाखती दिल्याने उमेदवारीसाठी भाजपमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
पक्षातील व्यक्तीस उमेदवारी देण्याचे ठरवले, तर मुख्य दावेदार कुमार आयलानी हे असून त्यांच्यासह पक्षाचे महापालिकेतील गटनेते जमनुदास पुरस्वानी, माजी शहराध्यक्ष महेश सुखरामाणी, ओमी कलानी, साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी, साई पक्षाचे नगरसेवक शेरी लुंड व कांचन लुंड यांनी मुलाखती दिल्या आहेत.
भाजपकडून कुमार आयलानी यांचे नाव आघाडीवर असले, तरी महापालिकेच्या सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या ओमी कलानी, साई पक्षाचे जीवन इदनानी यांनीही मुलाखती दिल्याने शहरातील सत्तेची समीकरणे बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. आयलानी यांच्या उमेदवारीला पक्षातील बहुसंख्य पदाधिकारी व नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादीच्या आ. ज्योती कलानी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असून त्यांनी सप्टेंबर महिन्यात पक्षप्रवेश केल्यास त्या स्वत: किंवा ओमी हेच भाजपच्या विधानसभा उमेदवारीचे प्रबळ दावेदार राहणार आहेत. महापालिकेत भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी अर्धेअधिक कलानी समर्थक आहेत. पालिका सत्तेत महत्त्वाची भूमिका वठवणारे साई पक्षाचे जीवन इदनानी यांनीही उमेदवारीकरिता प्रयत्न केल्याने उल्हासनगरात प्रथमच चुरस पाहायला मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती कायम राहिल्यास कुमार आयलानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे भाजपमधील काहींचे म्हणणे आहे. मात्र, युती तुटल्यास भाजप ओमी कलानी यांना रिंगणात उतरवेल, अशी चर्चा आहे.
आयलानी-कलानी सामना रंगणार
भाजप-शिवसेनेकडून कलानी कुटुंबातील कुणालाही उमेदवारी दिली गेली, तर शहर भाजपत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. आणि जर कलानी कुटुंबाला भाजपने डावलल्यास कलानी कुटुंब राष्ट्रवादी किंवा वंचित आघाडीच्या वतीनेही निवडणूक लढवेल, असे संकेत प्राप्त होत आहेत.
पालिका निवडणुकीच्यावेळी भाजपने ओमी कलानी टीमला हाताशी धरून सत्ता स्थापन केली. त्यानंतर महापौरपदासाठीही भाजपने ओमी टीमला फार रडकुंडाला आणले होते. अगदी हा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत जावे लागले होते.