इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये ठाणेकरांनी दिली भारतीय वस्तूंना पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 01:13 AM2020-06-24T01:13:41+5:302020-06-24T01:13:45+5:30
चीनमधून येणाऱ्या सर्व वस्तू भारतातच बनविल्या जाव्यात, अशी मागणी दुकान मालकांकडून होत आहे. किरकोळ विक्रेत्यांनाही चीनी वस्तुंची विक्री करण्याची इच्छा नसल्याचे नौपाडा व्यापारी मंडळाने सांगितले.
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भारत - चीन वादाचे पडसाद सर्वत्र उमटले असून त्याचा परिणाम इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवरदेखील झाला आहे. ग्राहक मोबाईलपासून अगदी एलईडी बल्बपर्यंत सर्वच वस्तू भारतीय बनावटीचे मागत असल्याचे दुकान मालकांनी सांगितले. चीनमधून येणाऱ्या सर्व वस्तू भारतातच बनविल्या जाव्यात, अशी मागणी दुकान मालकांकडून होत आहे. किरकोळ विक्रेत्यांनाही चीनी वस्तुंची विक्री करण्याची इच्छा नसल्याचे नौपाडा व्यापारी मंडळाने सांगितले.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठी बाजारपेठ भारतात चीनला मिळाली. चीनमध्ये उत्पादनाचा आणि मजुरांचा खर्च कमी असल्याने तेथून येणाºया वस्तूंची किंमत तुलनेने कमी आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून सीमेवर भारत - चीन वाद सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियापासून सगळीकडेच चीनला आणि तेथून येणाºया वस्तुंना विरोध दर्शविला जात आहे. ९0 टक्के मोबाईल चीनमधून येतात. ते सर्वसामान्यांना परवडणारे असतात. त्यामुळे ग्राहक याच मोबाइलला पसंती देतात. परंतु भारत-चीन वादामुळे ग्राहक भारतीय बनावटीच्या मोबाईलची मागणी करीत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सुरुवातीला मोबाईल घेण्याआधी ग्राहक ब्रँड बघत नव्हते. पण आता मोबाईल चीनचा आहे का, असे विचारत असल्याचे मोबाईल दुकानाचे मालक मितेश शहा यांनी सांगितले. सध्या ग्राहक केवळ मोबाईल दुरुस्तीसाठी येतात आणि स्वस्त चिनी मोबाईल खरेदी करतात. जुलै अखेरपर्यंत भारतीय मोबाईल येणार आहेत, त्यामुळे ग्राहक आता त्याच्याच प्रतीक्षेत असल्याचे शहा म्हणाले.
>एलईडी बल्ब, टॉर्च, विजेची तोरणे या वस्तू चीनमधून येत होत्या. परंतु आता एलईडी बल्बची केवळ लीड चीनमधून येते. चिनमधून येणारे टॉर्चदेखील बंद झाले असून विजेच्या तोरणामधील वायर भारतीय बनावटीची, तर त्यातील लीड चिनी आहे, असे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे विक्रेते रवी जैन यांनी सांगितले. ग्राहक दुकानात आल्यावर भारतीय वस्तू दाखविण्यावर भर देतो. ग्राहकाने विचारले नाही, तरी वस्तू भारतीय बनावटीची आहे की चिनी, हे आम्ही स्वत:हून सांगत असल्याचे ते म्हणाले.