ठाण्यात वर्तकनगरच्या ‘त्या’ हायरिस्कपैकी तीन पोलिसांना कोरोनाची लागण
By जितेंद्र कालेकर | Published: April 17, 2020 12:16 AM2020-04-17T00:16:48+5:302020-04-17T00:23:11+5:30
कोरोनाग्रस्त आरोपींच्या संपर्कामध्ये आल्यामुळे वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या २२ पोलिसांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या २२ कर्मचाऱ्यांसह ७० जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी तिघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे पोलिसांची चिंता आणखी वाढली आहे.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वर्तकनगर पोलीस ठाण्यातील २२ हायरिस्कमधील कर्मचाऱ्यांपैकी तीन पोलीस कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील कोरोना बाधित पोलिसांची संख्या आता दहावर पोहचली आहे.
या तिघांनाही ठाण्यातील दोन वेगवेगळया रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली होती. यात अटक झालेल्या सहा पैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या २२ पोलीस कर्मचा-यांचा हायरिस्कमध्ये समावेश केला होता. त्यातील १४ जण विलगीकरण केंद्रात तर आठ जण घरातच विलगीकरणात ठेवले होते. या २२ जणांसह वर्तकनगर पोलीस ठाण्यातील ७० पोलीस कर्मचा-यांची १४ एप्रिल रोजी ठाणे महापालिकेने तपासणी केली. यातील तिघांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यातील दोघांना कोणतीही लक्षण नव्हती तर एकाला ताप आला होता. विशेष म्हणजे त्यातील एकाची पाच दिवसांपूर्वी आरोपींबरोबरच तपासणी केली होती. त्यावेळी त्याचा अहवाल निगेटीव्ह आला होता. मात्र, आता पुन्हा मंगळवारी केलेल्या तपासणीत त्याच्यासह तिघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वर्तकनगर पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.
* आतापर्यंत मुंब्रा पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी दोन कर्मचारी, ठाणेनगर एक अधिकारी, मुख्यालयातील दोघे कर्मचारी आणि आता वर्तकनगरचे तीन अशा दहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
* दिलासादायक बाब म्हणजे ७० पैकी केवळ तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक या सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकाºयांचे कोरोनाचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.