दहीहंडी उत्सवात थर अन् बक्षिसांची रक्कमही घसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 04:25 AM2018-08-28T04:25:30+5:302018-08-28T04:26:33+5:30
ठाण्यात रंगणार प्रो गोविंदा : प्रताप सरनाईक यांची माहिती, बक्षीस घसरले पाच लाखांवर
ठाणे : राज्य शासनाने दहीहंडी उत्सवाला स्पर्धेचे स्वरुप दिले असले तरी त्याची अंमलबजावणी अद्यापही न झाल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसारच यंदाही हा उत्सव साजरा होणार आहे. ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे यंदा सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दहीहंडी उत्सव आणि सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रो- गोविंदा २०१८ ही स्पर्धा आयोजिली आहे. परंतु, यंदा दहीहंडीचे थर गडगडले असून बक्षिसांची रक्कमही कमी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक बंदी लागू असून, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या ‘से नो टू प्लास्टिक’ संकल्पनेची जनजागृती करण्यासाठी हा दहीहंडी उत्सव प्रयत्नशील असेल, अशी माहिती आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायलयाच्या नियमावलीमुळे गोविंदा पथकांमध्ये निरु त्साह होता. परंतु, तो उत्साह परत आणण्यासाठी प्रो कबड्डीच्या संकल्पनेवर आधारित प्रो गोविंदा २०१८ स्पर्धा रंगणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत नवोदित गोविंदा पथकांचे दहीहंडी फोडण्यासाठी थर लावण्यात येतील. त्यांचा प्रो गोविंदा स्पर्धेत सहभाग नसेल. ७ ते ८ थर लावणारी मुंबईतील ७ आणि ठाण्यातील ३ अशा एकूण १० गोविंदा पथकांचा प्रो गोविंदा २०१८ मध्ये समावेश असेल. मुंबई व ठाणे गोविंदा पथकातील समन्वय समितीमधील ४ सदस्य आणि संस्कृती युवा प्रतिष्ठानमधील एक सदस्य असे एकूण ५ सदस्य प्रो गोविंदा स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून निवडले जाणार आहेत. गोविंदा पथकामध्ये १४ वर्षांखालील मुलांचा सहभाग नसेल. तसे आढळल्यास वयाचा दाखला मागितला जाईल. प्रो गोविंदा पथकास प्रत्येकी ५० हजार व सन्मानचिन्ह दिले जाईल. त्याचबरोबर स्पर्धेमध्ये पहिले पारितोषिक ५ लाख व आकर्षक सन्मानचिन्ह, दुसरे पारितोषिक ३ लाख व सन्मानचिन्ह, तिसरे पारितोषिक २ लाख व सन्मानचिन्ह, चौथे पारितोषिक १ लाख व सन्मानचिन्ह देण्यात येईल. गोविंदा पथकाच्या सुरक्षतेचा विचार करता संपूर्ण मैदानाचा विमा काढण्यात येणार आहे; जेणेकरु न गोविंदा पथकांनादेखील विमा कवच राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले सर्व नियम पाळण्यात येतील व त्याचबरोबर गोविंदाची सुरक्षा हेच आमचे प्राधान्य राहिल असेही त्यांनी स्पष्ट केले.
यंदाही दहीहंडीत थरांवर थर लागणार नसल्याचे आ. सरनाईक यांनी स्पष्ट केले. काही वर्षांपूर्वी ९ ते १० थरांसाठी मुंबईतील गोविंदा पथकांची चुरस असायची, त्यासाठी २५ लाखांचे बक्षीसही दिले जात होते. यंदा मात्र थर गडगडले असून बक्षीसांची रक्कमही पाच लाखांवर आली आहे.