शालेय साहित्याची रक्कम खात्यांमध्ये, स्थायी समितीची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 02:49 AM2018-08-15T02:49:24+5:302018-08-15T02:50:02+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या खात्यांमध्ये शालेय साहित्य खरेदी करण्याची रक्कम वर्ग करण्यास स्थायी समितीमध्ये मंगळवारी मंजुरी देण्यात आली.
कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या खात्यांमध्ये शालेय साहित्य खरेदी करण्याची रक्कम वर्ग करण्यास स्थायी समितीमध्ये मंगळवारी मंजुरी देण्यात आली. ही रक्कम चार कोटी ४१ लाख रूपये असून सभेच्या वेळेवरच्या विषयांमध्ये हा मुद्दा उपस्थित झाला होता.
शालेय साहित्य खरेदीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येते. त्यानुसार महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खात्यात शालेय साहित्य खरेदीची रक्कम वर्ग केली जाणार आहे. एकूण चार कोटी ४१ लाख रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचा प्रस्ताव आज मांडला गेला. त्याला स्थायी समिती सभापती राहूल दामले यांनी मंजुरी दिली. महापालिका हद्दीत मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, तामीळ आदी माध्यमांच्या ७१ शाळा आहेत. त्यात जवळपास दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे. बालवाडी, इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर, रेनकोट, वह्या, कंपास, बूट, मोजे, पीटी ड्रेस, स्पोर्ट शू, वॉटर बॅग, टिफीन बॉक्स या साहित्य खरेदीसाठी हे अनुदान मंजूर करण्यात आले. वास्तविक, हा विषय शाळा सुरु होण्यापूर्वीच मंजूर होणे आवश्यक होते.
२७ गावे महापालिकेत आहेत; मात्र या २७ गावांतील २८ जिल्हा परिषदेच्या शाळांचा कारभार महापालिकेकडे हस्तांतरीत झालेला नाही. ही गावे महापालिकेत असल्याने त्या शाळेतील विद्यार्थ्यानाही शालेय साहित्य दिले जाणे आवश्यक असल्याची मागणी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी सभेत केली. त्यावर अधिकारी जे. जे. तडवी यांनी सांगितले की, निविदा प्रक्रिया राबवून शालेय साहित्य खरेदी केली जात होती. २७ गावांतील २८ शाळांना शालेय साहित्य पुरविले गेले. त्या शाळेतील विद्यार्थ्यांनी बँक खाती उघडलेली नाहीत. त्यामुळे त्यांना हा लाभ देता येणार नाही. यावर तोडगा म्हणून २७ गावांतील विद्यार्थ्यांसाठी साहित्य खरेदी करुन, ते विद्यार्थ्यांना द्या असे आदेश सभापती दामले यांनी दिले.
महापालिकांच्या विविध शाळांमध्ये भंगार साहित्य पडून आहे. त्याविषयी काही कारवाई केली जात नाही. उंबर्डे येथील शाळेतील भंगार साहित्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचा मुद्दा शिवसेना सदस्य जयवंत भोईर यांनी उपस्थित केला. पाणी पुरवठा विभागानेही याची दखल घ्यावी. पाण्याच्या टाक्याजवळही असेच भंगार साहित्य असते. त्याठिकाणी अडगळीची जागा होते. त्यात एक कुत्रे मरुन पडल्याची बाब शिवसेना सदस्य निलेश शिंदे यांनी उपस्थित केली. मागच्यावर्षी एका जलवाहिनीतून कुत्र्याचे पिल्लू आले होते. महापालिकेच्या विविध प्रभाग कार्यालयातही भंगार साचले आहे. ते विक्रीस काढा असे यावेळी सूचित करण्यात आले.
महापलिका शाळांमधील भंगार विक्रीस काढण्याकरीता त्याचे मुल्यांकन करण्यात आले. त्यासाठी चार वेळा निविदा मागवूनदेखील प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुनर्मुल्यांकन करण्यास शिक्षण विभागाला सांगण्यात आले आहे. त्यांच्याकडून अद्याप पुनर्मूल्यांकन आलेले नाही, अशी माहिती उपायुक्त सु. रा. पवार यांनी दिली. पुनर्मुल्यांकन प्राप्त होताच भंगार विक्रीस काढले जाईल, असेही ते म्हणाले.