शालेय साहित्याची रक्कम अकाउंटमध्ये जमा

By Admin | Published: March 17, 2017 06:10 AM2017-03-17T06:10:23+5:302017-03-17T06:10:23+5:30

मुंबईच्या धर्तीवर ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या हाती टॅब पडणार, याची चर्चा मागील वर्षभर सुरू होती. त्यानंतर, पहिल्या टप्प्यात १५० विद्यार्थ्यांच्या हाती टॅब पडले

The amount of school material deposited in the account | शालेय साहित्याची रक्कम अकाउंटमध्ये जमा

शालेय साहित्याची रक्कम अकाउंटमध्ये जमा

googlenewsNext

ठाणे : मुंबईच्या धर्तीवर ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या हाती टॅब पडणार, याची चर्चा मागील वर्षभर सुरू होती. त्यानंतर, पहिल्या टप्प्यात १५० विद्यार्थ्यांच्या हाती टॅब पडले असल्याचा दावा पालिकेने केला आहे. परंतु, आता विद्यार्थ्यांच्या हाती ते पडणारच नसून टॅबची रक्कम ही त्या विद्यार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे. शासनाने काढलेल्या एका अध्यादेशानुसार टॅब असो वा वॉटरबॅग, दप्तर, गणवेश आदी सर्वांची रक्कम ही आता बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यानुसार, ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागानेदेखील त्यानुसार पावले उचलली असून या सर्व साहित्याची रक्कम बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आतापर्यंत तब्बल मागील सुमारे २८ हजार विद्यार्थ्यांचे बँक अकाउंट उघडण्यात आले असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
राज्य शासनाने ५ डिसेंबर २०१६ मध्ये एक अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशानुसार विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तुरूपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतर, रोख स्वरूपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय या अध्यादेशानुसार घेण्यात आला आहे. यामुळे लाभार्थ्यांना प्रत्येक योजनेचा पूर्णपणे लाभ होऊन अनावश्यक गोष्टी टाळता येऊ शकतील, असा यामागचा उद्देश शासनाचा आहे. त्यानुसार, यासंदर्भातील एक कार्यपद्धतीदेखील निश्चित करण्यात आली असून यामध्ये वस्तूंबाबत वितरण योजना तयार करणे, वस्तू विकत घेण्यासाठी अनुदान ठरवणे, वितरित करण्यात येणाऱ्या वस्तूंचे परिमाण ठरवणे, या योजनांतर्गत पात्रतेचे निकष, पात्रतेप्रमाणे लाभार्थ्यांची निवड, लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडणी करणे, निवड केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणाला मान्यता देऊन त्यांना लेखी कळवणे, लाभार्थ्यांनी परिमाणाप्रमाणे वस्तूंची खरेदी करणे आणि संबंधित यंत्रणेने लाभार्थ्याने खरेदी केलेल्या वस्तूंची व सादर केलेल्या पावतीची शहानिशा करूनच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करणे आदी महत्त्वाच्या कार्यपद्धती निश्चित केल्या आहेत.
त्यानुसार, ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागानेदेखील या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले असून त्यानुसार आतापर्यंत ३४ हजार विद्यार्थ्यांपैकी तब्बल २८ हजार विद्यार्थ्यांचे बँक अकाउंट उघडण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी लोकमतशी बोलताना दिली.
त्यानुसार, आता विद्यार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये गणवेश असो अथवा टॅब, वॉटरबॅग, पुस्तके आदींसह इतर साहित्यांची रक्कमही जमा होणार आहे. परंतु, या प्रत्येक वस्तूचे बाजारदर निश्चित केले जाणार आहेत. त्यानुसारच प्रत्येक वस्तूची खरेदी करणे विद्यार्थ्यांकडून अपेक्षित धरण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The amount of school material deposited in the account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.