दिल्लीच्या अमृत वाटिकेसाठी ठाणे जिल्ह्यातील माती, तांदूळ घेवून अमृत कलश रवाना
By सुरेश लोखंडे | Published: October 26, 2023 06:56 PM2023-10-26T18:56:35+5:302023-10-26T18:57:24+5:30
देशप्रेमाने भारावलेल्या अत्यंत उत्साही वातावरणात व भारतमाता की जय, वंदे मातरम् च्या जयघोषात व लेझीम पथकांच्या साथीने कलश घेवून जाणाऱ्या बस सायंकाळी मुंबईला रवाना झाली आहे.
ठाणे: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत "मेरी माटी मेरा देश" अर्थात "माझी माती माझा देश" या उपक्रमामध्ये ठाणे जिल्ह्यातील "अमृत कलश" घेवून जाणाऱ्या स्वयंसेवक व कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते आज शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी कायार्लयाच्या प्रांगणातून रवाना झालेल्या बसला निराेप देण्यासाठी अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये-धुळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी.गोदापुरे,जिल्हा क्रीडा अधिकारी सूवर्णा बारटक्के, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर(नि.)प्रांजळ जाधव, तहसिलदार नीलिमा सूर्यवंशी, संजय भोसले आदी उपस्थित होते.
देशप्रेमाने भारावलेल्या अत्यंत उत्साही वातावरणात व भारतमाता की जय, वंदे मातरम् च्या जयघोषात व लेझीम पथकांच्या साथीने कलश घेवून जाणाऱ्या बस सायंकाळी मुंबईला रवाना झाली आहे. त्यासाठभ् ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात खास कार्यक्रम साजरा करण्यात आला. यासाठी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, अभ्यागत उत्साहाने सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा व ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये "माझी माती माझा देश" उपक्रमाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावातून व वॉर्डातून माती व तांदूळ गोळा करून जिल्ह्यातून सहा महापालिका, नगरपरिषदेचा एक व ठाणे जिल्हा परिषदेच्या पंचायत समित्यांचे पाच असे एकूण १२ कलश मुंबईतील राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी नेण्यात येत आहेत.
आज या कलशांना स्वयंसेवकांच्या हस्ते मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात होणाऱ्या कार्यक्रमासाठी रवाना करण्यात आले. यावेळी ठाणे महापालिकेचे सुरक्षा रक्षक व टीडीआरएफच्या पथकाने अमृत कलशांना सलामी दिली. यावेळी ठाणे महापालिकेचे कर्मचारी योगेश विसपुते यांनी जबरदस्त पोवाडा सादर केला. यावेळी ठाणे शहरातील राबोडी येथील सरस्वती हायस्कूल ॲण्ड कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीमचा बहारदार खेळ सादर केला. ठाणे महानगरपालिकेच्या फुलांनी सजविलेल्या ई-बसमधून उल्हासनगर महापालिकेच्या सचिव तथा या उपक्रमाच्या समन्वयक प्राजक्ता कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील २४ स्वयंसेवकांची तुकडी अमृत कलश घेऊन मुंबईकडे रवाना झाली.