आमटे कुटुंबीयांचे सेवाकार्य पाहून रोटरीयन्स भारावले; आनंदवन, हेमलकसाला दिली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 10:54 PM2020-01-15T22:54:20+5:302020-01-15T22:54:30+5:30
‘रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल’चा उपक्रम, विविध वस्तूंची केली मदत
अंबाडी : भिवंडी तालुक्यातील ‘रोटरी क्लब आॅफ भिवंडी रु रल’च्या रोटरीयन्सने नुकतीच समाजसेवक बाबा आमटे यांच्या चंद्रपूर आणि गडचिरोली येथील आनंदवन, हेमलकसा आणि सोमनाथ या प्रकल्पांना भेट दिली. आमटे कुटुंबीयांचे सेवाकार्य पाहून रोटरीयन्स भारावून गेले.
रोटरी क्लबतर्फे संस्थापक हरिश्चंद्र भोईर, माजी अध्यक्ष प्रकाश म्हात्रे आणि अध्यक्ष रोटरीयन प्रमोद म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबच्या २६ रोटरीयनची टीम, सेक्रेटरी संदीप म्हात्रे, उपाध्यक्ष प्रमोद भोकरे, खजिनदार राजू बेलेकर पास्ट प्रेसिडेंट रो. जगदीश म्हात्रे, प्रभाकर पाटील, सदस्य अॅड. गिरीश पाटील, प्रेमनाथ नाईक, शंकर भोईर, देवानंद पाटील, संदेश भोईर, श्याम भोईर, भानुदास पाटील, विश्वनाथ पाटील, पंकज तरे, विकास गायकवाड, राम म्हात्रे आदींनी बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या लोकबिरादरी प्रकल्प आणि इतर प्रकल्पांना भेटी दिल्या.
बाबा आमटे यांनी प्रामुख्याने कुष्ठरुग्णांच्या सेवेचे कार्य करतानाच चंद्रपूर आणि गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भागांतील गौड आदिवासी या अतिमागास जमातीसह तेथील पीडित, वंचित, अपंग अशा दुर्लक्षित घटकांसाठी डॉ. विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे यांच्यासह त्यांच्या तिसऱ्या पिढीनेही हे सेवाव्रत सुरू ठेवले आहे.
आमटे कुटुंबीयांचे हे सेवाकार्य पाहून रोटरीयन्स भारावून गेले. कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणाºया या महान समाजसेवकाच्या कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा, यासाठी रोटरी क्लब आॅफ भिवंडी रुरलतर्फे ५१ हजारांचा धनादेश आणि टेम्पो भरून कपडे तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी बिस्किटे, चॉकलेट आदी खाद्यपदार्थांचे वाटप केले.
निवृत्तीनंतर सेवा करण्याचा मनोदय
क्लबचे सदस्य असलेले शिक्षक शंकर भोईर व प्रेमनाथ नाईक यांनी निवृत्तीनंतर किमान सहा महिने या प्रकल्पांमध्ये सेवा करण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच क्लबचे सदस्य संदेश भोईर यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हेमलकसा येथील ६५० शालेय विद्यार्थ्यांना केक आणि चिक्कीचे वाटप करण्यात आले.