घोडबंदर गावाजवळ नकली अमूल बटरचा कारखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 10:41 PM2018-12-25T22:41:18+5:302018-12-25T22:41:26+5:30
घोडबंदर गावा लगतच्या एका गाळ्यात बनावट अमूल बटर बनवण्याचा कारखानाच पोलिसांनी धाड टाकून उघडकीस आणला आहे. येथून सुमारे 400 किलो बनावट बटरचा साठा सापडला आहे.
मीरारोड - घोडबंदर गावा लगतच्या एका गाळ्यात बनावट अमूल बटर बनवण्याचा कारखानाच पोलिसांनी धाड टाकून उघडकीस आणला आहे. येथून सुमारे 400 किलो बनावट बटरचा साठा सापडला आहे.
भाईंदर विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना माहिती मिळाली होती की, घोडबंदर गावा जवळ असणाऱ्या औद्योगिक वसाहत मधील एका गाळ्यात बनावट अमूल बटर बनवण्याचा कारखाना सुरू आहे. खात्री पटताच आज मंगळवारी कुलकर्णी यांनी पोलीस पथकासह गाळ्यावर धाड टाकली.
सदर ठिकाणी बटर बनवून अमूल बटर च्या छापलेल्या वेष्टन व पाकिटात भरले जात होते. पोलीसांना अर्धा किलोच्या वेष्टनात गुंडाळललेला, पाकिटात भरलेला तसेच क्रेट मध्ये ठेवलेला बटर चा मोठा साठा सापडला आहे.
या कारखान्यात बटर बनवून ते अमूलच्या पाकिटात भरून बाजारात पुरवले जात होते. जास्त करून सदर बनावट बटर हातगाडीवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना तसेच बार, हॉटेल आदींना पुरवले जात असल्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे. सदर कारखाना बंद करण्यात आला असून उद्या बुधवारी अन्न व औषध प्रशासन चे अधिकारी आल्यावर फिर्याद दाखल करण्यात येणार असल्याचे काशिमीरा पोलीस ठाण्यातील सूत्रांकडून सांगण्यात आले.