ठाण्यात नवमतदारांच्या संख्येत ४० हजारांची भर, एकूण संख्या ६३ लाख ४३ हजार ८८९
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 09:18 AM2024-01-18T09:18:38+5:302024-01-18T09:20:24+5:30
केंद्रीय निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे.
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मतदारयादीमध्ये १२ जानेवारीपर्यंत आणखी ४८ हजार ४७१ मतदारांची वाढ झाली आहे. २७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ६३ लाख ४३ हजार ८८९ मतदारांची नोंद झाली होती. त्यानंतर ही मोहीम पुढेही सुरू राहिली होती. त्यानुसार आता एकूण मतदारांची संख्या ६३ लाख ९२ हजार ३६० नोंद झाली आहे. नवमतदारांमध्ये सुमारे ४० हजारांची भर पडल्याचे दिसून आले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. या कार्यक्रमामध्ये निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांच्या तारखांमध्ये बदल केला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात २२ जानेवारी रोजी १८ विधानसभा मतदारसंघाची एकत्रिकृत प्रारूप मतदारयादी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय, संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांचे मध्यवर्ती कार्यालय (उढर), सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय तसेच सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत प्रसिद्ध केली जाणार आहे.
स्त्री-पुरुष मतदार
पुरुष मतदारांची संख्या ३४ लाख ४९ हजार ४९०, स्त्री मतदारांची संख्या २९ लाख ४१ हजार ६४२, इतर मतदारांची संख्या १ हजार २२८ एवढी नोंद झाली आहे. त्यातही मतदार नोंदणीमध्ये १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या ३० हजार १३० वरून ६९ हजार ७२० एवढी झाली आहे.
१८ ते १९ गट
दरम्यान, ५ जानेवारी रोजी महिलांचे प्रमाण (जेंडर रेशो) - ८४५ होते. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी महिलांचे प्रमाण ८४८ इतके झालेले आहे. त्यानंतर आता हाच रेशो ८५२ एवढा झाला आहे. जिल्ह्यातील १८-१९ वयोगटातील मतदारांची संख्या ६९ हजार ७२० इतकी झाली आहे.
तृतीयपंथींची नोंदणी
दिव्यांग मतदार नोंदणी ३२ हजार २१९ इतकी आहे. तर ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १,२२८ तृतीयपंथी यांची मतदार नोंदणी करण्यात आली आहे.