भडकलेल्या महिलेची पतीसह पोलिसांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 01:29 PM2022-09-04T13:29:44+5:302022-09-04T13:29:50+5:30
निकिताने सारिका यांच्यासह पोलीस शिपाई निखिल मोरे यांना अर्वाच्च शिवीगाळ, धक्काबुक्की केली.
मीरारोड : पतीने त्याच्या भावाविरुद्ध तक्रार द्यावी म्हणून पोलीस ठाण्यात धिंगाणा घालत पतीला शिवीगाळ, धक्काबुक्की करणाऱ्या निकिता कुर्डेकर (३२, रा. श्रीधाम, गणेश गल्ली, नवघर मार्ग) या महिलेने पोलिसांनाही शिवीगाळ, धक्काबुक्की केली. बेभान झालेल्या निकिताने एका पोलिसाला चापट मारल्याने तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री हा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता.
शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास निकिता ही महिला पती नभिजितबरोबर नवघर पोलीस ठाण्यात आली. ती तिच्या नवऱ्याला शिवीगाळ करीत होती व येणाऱ्या कॉलवर आरडाओरडा करीत होती. पतीच्या भावाने जमीन खरेदीसाठी घेतलेले पैसे परत केले नाहीत म्हणून तक्रार देण्यास ती ओरडून सांगत होती; तर पती मात्र नकार देत होता. त्यातूनच तिचा पोलीस ठाण्यात गोंधळ सुरू झाला. निकिताने पतीला पोलीस ठाण्यात शिवीगाळ, धक्काबुक्की केली.
मोबाइलमध्ये शूटिंग -
- सहायक उपनिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी निकिताला पोलीस ठाण्यात शांतता राखण्यास सांगितले असता तिने त्यांना शिवीगाळ करीत मोबाइलमध्ये शूटिंग करू लागली.
- जाधव यांनी मोबाइल कॅमेरा बंद करण्यास सांगताच निकिताने जाधव यांना चापट लगावली.
- ती शिवीगाळ करीत मारण्यासाठी जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याने त्यांनी तिला मागे ढकलले.
- गोंधळ ऐकून महिला उपनिरीक्षक सारिका वाघचौरे आल्या व त्यांनी निकिता हिला बाजूला केले.
- निकिताने सारिका यांच्यासह पोलीस शिपाई निखिल मोरे यांना अर्वाच्च शिवीगाळ, धक्काबुक्की केली.
- अखेर निकिताविरुद्ध जाधव यांच्या फिर्यादीवरून शनिवार, ३ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.