बकऱ्यावरून मीरारोडच्या गृहसंकुलात तणावाचे वातावरण; ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल 

By धीरज परब | Published: June 28, 2023 05:22 PM2023-06-28T17:22:17+5:302023-06-28T20:56:56+5:30

वास्तविक सदर संकुलात या आधी बकरी ईद साठी हिंदू व मुस्लिम धर्मीय रहिवाश्यात सामंजस्याने निर्णय होऊन बकऱ्यांना ठेवण्यास जागा देण्यात आली होती.

An atmosphere of tension in the housing complex of Miraroad over Goat; A case has been registered against 40 to 50 people | बकऱ्यावरून मीरारोडच्या गृहसंकुलात तणावाचे वातावरण; ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल 

बकऱ्यावरून मीरारोडच्या गृहसंकुलात तणावाचे वातावरण; ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल 

googlenewsNext

मीरारोड - मीरारोडच्या जे पी नॉर्थ ह्या गृहसंकुलात बकरी ईद निमित्त बकरा आणण्याच्या कारणावरून रहिवाश्यानी एका विशिष्ट धर्माच्या कुटुंबास घेरून धक्काबुक्की करत गाडीची तपासणी केली . बुधवार पहाटे पर्यंत संकुलाच्या आवारात धार्मिक घोषणा देण्यासह रहिवाश्यांनी बकऱ्यास विरोध केला. याप्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात ४१ ते ५२ रहिवाश्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यावेळी पोलिसांना राहिवाशांनी धक्काबुक्की केल्याची माहिती आहे.  

महामार्गा लगत वेस्टर्न हॉटेल जवळ जे पी नॉर्थ हे मोठे गृहसंकुल आहे . सदर संकुलातील एस्टेला इमारतीत  मोहसीन खान , त्यांची पत्नी व ४ वर्षांचा मुलगा राहतात .  तर मंगळवारी रात्री ईद निमित्त खरेदी करून इमारतीत परत आले असता रहिवाश्यांच्या जमावाने त्यांची गाडी अडवून गाडीत कुर्बानी साठी बकरा आणलाय का म्हणून जबरदस्तीने तपासणी सुरु केली . तसेच घरात ठेवलेला बकरा काढून टाका ,  सोसायटीच्या परवानगी शिवाय बकरा कसा काय आणला ? असे दरडावू  लागले . त्यातून दोन्ही बाजूने  बोलाचाली होऊन वाद वाढला. जमावाने मोहसीन ला धक्काबुक्की चालवली असता त्यांची पत्नी सोडवण्यास गेली.  तिचा हात मुरगळला व कपडे फाडले. तिने ११२ क्रमांकावर मदतीसाठी कॉल करत काशीमीरा पोलीस ठाणे गाठले. तर रात्री गृहसंकुलात रहिवाशी मोठ्या संख्येने जमले व हनुमान चालीसा म्हणत जय श्रीरामच्या घोषणा देऊ लागले.

घटनास्थळी मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे व मुख्यालय उपायुक्त प्रकाश गायकवाड , सहायक आयुक्त महेश तरडे , काशीमीराचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी तसेच दंगल नियंत्रण पथक दाखल झाले . सोसायटीत कुर्बानी तसेच बकरा ठेवण्यास परवानगी नसताना बकरा आणला म्हणून कारवाई करा असे सांगत रहिवाशी विरोध करू लागले. पोलिसांनी समजूत घालायचा प्रयत्न केली नंतर देखील रहिवाशी ऐकत नव्हते व घोषणाबाजी करत होते . बुधवारच्या पहाटे अखेर रहिवाश्याना पांगवल्या नंतर ४ च्या सुमारास पोलिसांनी मोहसीन यांच्या घरातील बकरा हा बाहेर काढून अन्यत्र नेला. 

मोहसीन यांच्या पत्नीच्या फिर्यादी वरून बुधवारी पहाटे ओळख पटलेले काळा टीशर्ट मधील इसम, उदयचंद्र कामत , आशिष त्रिपाठी , लाल सिंग , चंद्रा सेन , अमित तिवारी , धर्मेंद्र सिंग , राम लखन सिंग , आनंद पटवारी , श्रीमंत शेखर  तसेच अन्य  ३० ते ४० जण अश्या लोकांवर विनयभंग सह दंगल आदी प्रकरणी गुन्हा दाखल केला. तर गुन्हा दाखल केल्या बद्दल संताप व्यक्त करत बुधवारी सायंकाळी काही रहिवाशी हे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात जमावाने  जमले. पोलिसांनी दाखल गुन्ह्यात कोणाला अटक केलेली नसून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले . संकुलातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य व्हिडीओ क्लिप आदी पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासणी चालवली आहे . मोहसीन याने ईद साठी मंगळवारी दुपारीच घरात बकरा आणून ठेवला होता.

वास्तविक सदर संकुलात या आधी बकरी ईद साठी हिंदू व मुस्लिम धर्मीय रहिवाश्यात सामंजस्याने निर्णय होऊन बकऱ्यांना ठेवण्यास जागा देण्यात आली होती . त्यावेळी देखील कुर्बानी संकुलात देऊ नये, स्वच्छता ठेवावी असे ठरले होते . मात्र अस्वच्छता होत असल्याने, बकऱ्यांची संख्या वाढू लागल्याने तसेच काही जण अन्य रहिवाश्या जुमानत नसल्याने यंदा रहिवाश्यांनी ईद साठी बकरे संकुलात ठेवण्यास नकार दिला होता . तरी देखील  मोहसीन खान याने बकरा आणून घरात ठेवला म्हणून हा सर्व वाद निर्माण झाल्याचे काही रहिवाश्यांनी सांगितले. तर कालच्या घटनेत काही रहिवाश्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब तसेच पोलीस व पालिकेस कळवून कार्यवाही करायला लावणे आवश्यक होते . परंतु कायदा हातात घेऊन धार्मिक रंग देत तणाव निर्माण केल्याने टीका देखील होत आहे . 

Web Title: An atmosphere of tension in the housing complex of Miraroad over Goat; A case has been registered against 40 to 50 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.