ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात तासभर बत्ती गुल, कामकाजावर परिणाम
By सुरेश लोखंडे | Published: January 19, 2023 06:05 PM2023-01-19T18:05:39+5:302023-01-19T18:05:59+5:30
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात तासभर लाईट गेल्याने कामकाजावर परिणाम झाला.
ठाणे: विविध स्वरूपाचे कामे करून घेण्यासाठी जिल्हाभरातील नागरिक सकाळीच येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गाठत असतात, मात्र गुरुवारी दुपारी १२ पासून ते एक ते दीडपर्यंत या कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे कामकाजावर परिणाम झाल्याने विविध कामांसाठी ठाण मांडून बसलेल्या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
ऐन कामाच्या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचा विद्युत पुरवठा आज खंडित झाला होता. त्यामुळे या कार्यालयांमध्ये कर्मचारी, अधिकारी अंधारात बसून होते. एवढेच नव्हे, तर कामे करून घेण्यासाठी सकाळीच कार्यालय गाठलेल्या नागरिकांना अंधारामुळे त्यांच्या कामाच्या टेबलापर्यंतही जाता आले नाही. तब्बल दोनच्या दरम्यान विद्युत पुरवठा सुरू झाला. तत्पूर्वी कर्मचाऱ्यांनी त्यांचे जेवण अंधारातच घेतले, तर काही कर्मचाऱ्यांनी विजेची वाट पाहात बसणे पसंत केले. या कार्यालयाचे संपूर्ण काम बंद पडल्यामुळे कर्मचाऱ्यांनीही संताप व्यक्त केला, तर या कार्यालयाच्या फेऱ्या मारण्यात वेळ घालवणाऱ्या नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.