लष्कर अधिकारी असल्याची बतावणी करीत ७५ हजारांची फसवणूक, आरोपी पसार
By जितेंद्र कालेकर | Published: February 8, 2023 08:25 PM2023-02-08T20:25:19+5:302023-02-08T20:25:50+5:30
ठाण्यात लष्कर अधिकारी असल्याची बतावणी करीत ७५ हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली.
ठाणे: लष्करात अधिकारी असल्याची बतावणी करीत एकाने मानपाडा येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रमेशचंद्र त्रिपाठी (वय ६०) यांना ७५ हजारांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती चितळसर पोलिसांनी बुधवारी दिली. त्रिपाठी यांना १६ जानेवारी २०२३ ला सायंकाळी ६.३० ते १७ जानेवारी २०२३ सायंकाळी ७.४५ च्या सुमारास भामट्याने मोबाईलवरून संपर्क साधून आपण आर्मी ऑफिसर असल्याची बतावणी केली. आमीर्ची औषधे मुंबई एअरपोर्ट ते हैदराबाद एअरपोर्ट येथे नेण्यासाठी कंटेनर हवा असल्याचेही सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर त्यांचे बँक खाते पडताळणी करण्याचा बहाणा करून या भामट्याने त्यांच्या बँक खात्यावर ७५ हजार पाठविण्यास त्रिपाठी यांना भाग पाडून त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकाराबाबत त्रिपाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ क आणि ड सह फसवणुकीचा गुन्हा ७ फेब्रुवारी २०२३ ला चितळसर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सुरवाडे हे करीत आहेत.